school viral video: सोशल मीडियावर सध्या मध्य प्रदेशातील शेओपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत लहान मुलं शाळेच्या आवारात बसून फाटलेल्या कागदांवर मीध्यान्ह भोजन खाताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक संतापले आहेत आणि शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप होत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

हा व्हिडीओ शेओपूर जिल्ह्यातील विजयपूर ब्लॉकमधील हुल्लपूर गावातील माध्यमिक शाळेचा असल्याचं सांगितलं जातं. या शाळेत मुलांना जेवणासाठी प्लेट न देता, थेट कागदांवर अन्न देण्यात आलं. ही घटना शाळेच्या परिसरातच घडली असून, काही शिक्षक आणि स्वयंपाकघर चालवणाऱ्या स्वयंसहायता गटाच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.

व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांचा गट शाळेच्या आवारात जमिनीवर बसलेला दिसतो. त्यांच्यासमोर अन्न दिलं गेलेलं आहे; पण ते अन्न फाटलेल्या, कचऱ्यातील कागदांवर वाढल गेलं आहे. काही मुलं अन्न खाण्याआधी कागदांची स्थिती पाहत आहेत; तर काही जण अन्न खाली पडू नये म्हणून सावधपणे खाताना दिसतात. परिसरात कोणतीही सावली किंवा आसरा नसल्यानं मुलं उन्हात बसून जेवत आहेत, हे दृश्य पाहून संताप आणि दुःख दोन्ही निर्माण होतं.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. काहींनी “हीच का ‘पोषण योजना’?” असा प्रश्न उपस्थित केला; तर काहींनी “बाळांच्या अन्नाशी असा खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी,” अशी मागणी केली आहे. काही जणांनी सरकारच्या आश्वासनांवर प्रश्न उपस्थित करीत म्हटलं, “निवडणुकीच्या वेळी दिलेली गुणवत्तापूर्ण अन्नाची हमी कुठे गेली?” तर काहींनी सामाजिक जबाबदारीची भावना व्यक्त करीत असंही म्हटलं, “आपल्या देशात अजूनही अशा घटना घडतात, हे लाजिरवाणं आहे.”

ही घटना केवळ एका शाळेची नाही, तर राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळ अंमलबजावणी आणि जबाबदारीच्या अभावाचं उदाहरण आहे. शासनानं ‘PM पोषण’ योजनेतून मुलांच्या आरोग्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना अशा निष्काळजीपणामुळे धक्का बसत आहे. समाजमाध्यमांवर या घटनेवर चर्चा सुरू असून, पालक आणि नागरिक प्रशासनाकडून ठोस पावलं उचलण्याची मागणी केली जात आहे.