Emotionl viral video: आजच्या काळात डॉक्टर म्हणजे देवाचा दुसरा अवतार, असं अनेकदा म्हटलं जातं. कारण- ते रुग्णांना मृत्यूपासून वाचवतात. पण, या महागाईच्या काळात डॉक्टरांकडून उपचार करून घेणं अनेकांसाठी परवडत नाही. त्यांची कन्सल्टिंग फी इतकी वाढली आहे की, काही रुग्ण डॉक्टरांच्या फीच्या भीतीनंच त्यांच्याकडे जाणं टाळतात. अशातच एका डॉक्टरचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे, जो पाहून कोणाच्याही डोळ्यांत पाणी तरळेल.

हा हृदयस्पर्शी व्हिडीओ एका गरीब आजी आणि दयाळू डॉक्टर यांच्यातील माणुसकीचा सुंदर क्षण दाखवतो. व्हिडीओमध्ये दिसतं की, एक वयोवृद्ध महिला आपल्या नातवाला घेऊन डॉक्टरांकडे उपचारासाठी आल्या आहेत. तपासणी झाल्यानंतर त्या काही पैसे डॉक्टरांना देण्याचा प्रयत्न करतात. पण, डॉक्टर मोठ्या प्रेमानं त्यांना थांबवतात आणि म्हणतात, “आजी, तुमचा आशीर्वादच माझ्यासाठी पुरेसा आहे.” या एका वाक्यानं त्या वृद्धेच्या डोळ्यांत पाणी येतं. त्या डॉक्टरांच्या डोक्यावर हात ठेवतात, त्यांना आशीर्वाद देतात, त्यावेळी भावनावेग न आवरता आल्यानं त्यांच्या अश्रूंचा बांध फुटतो.

तिथे उपस्थित असलेले इतर लोकही हा प्रसंग पाहून भावूक होतात. डॉक्टर आजीला वाकून अभिवादन करतात. व्हिडीओमध्ये दिसतं की, त्या वृद्ध आजींची आर्थिक अवस्था फारशी चांगली नाही. पण, डॉक्टरांनी दाखवलेली माणुसकी, आदर व करुणा याद्वारे त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. एका युजरनं लिहिलं, “चांगलं कर्म करीत राहा. कारण- कोणाचा आशीर्वाद कधी लाभेल हे सांगता येत नाही.” दुसऱ्यानं म्हटलं, “पैसा नसेल तरी चालेल; पण अशी माणुसकी प्रत्येक डॉक्टरमध्ये असायला हवी.” तिसऱ्यानx प्रतिक्रिया देत म्हटलं, “सगळ्यात मोठं दान म्हणजे आशीर्वाद. कारण- जेव्हा दुआ लागते तेव्हा आयुष्यात काहीही अशक्य राहत नाही.”

पाहा व्हिडिओ

अनेकांनी या डॉक्टरांचं कौतुक केलं आणि लिहिलं की, आजच्या जगात जेव्हा रुग्णालयं आणि दवाखाने पैसे कमविण्याचे साधन बनले आहेत, तेव्हा अशा डॉक्टरांनी दाखवून दिले आहे की, जगात अजूनही मानवता जिवंत आहे. एका युजरनं तर म्हटलं, “अशा डॉक्टरांची गरज आहे आजच्या समाजाला. कारण- पैसा येतो-जातो पण दुआ आयुष्यभर सोबत राहते.”

हा व्हिडीओ केवळ डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध नव्हे, तर माणुसकीची खरी ओळख दाखवतो. या एका छोट्या कृतीतून डॉक्टरांनी समाजाला मोठा संदेश दिला आहे की, माणुसकी हीच खरी संपत्ती आहे.