Man Carries 8 Foot Crocodile On Shoulder : सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ, फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. कधी दोन प्राण्यांमध्ये शिकारवरून भांडण, तर कधी प्राण्यांचा माणसांवर हल्ला. पण, आज सध्या सोशल मीडियावर अशी एक घटना व्हायरल होते आहे; जे वाचून तुम्हाला नक्कीच धडकी भरेल.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कोटाच्या इटावा उपविभागातील बंजारी गावात रात्री १० वाजण्याच्या सुमारास खोलीत सगळं कुटुंब एकत्र बसलं होतं. यादरम्यान समोर दारातून अचानक मगर आतमध्ये आली. कुटुंबाला काही समजण्यापूर्वीच मागच्या खोलीत गेली. संपूर्ण कुटुंब घाबरून घराबाहेर पळू लागले. असे गावातील रहिवासी लातुरलाल यांनी सांगितले. कुटुंबाने ताबडतोब स्थानिक अधिकाऱ्यांना कळवले. पण, बराच वेळ कोणताही अधिकारी किंवा बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही.
परिसरात भीती पसरल्याने, गावकऱ्यांनी इटावा येथील वन्यजीव उत्साही हयात खानशी संपर्क साधला; ज्यांनी या प्रदेशात अनेक बचाव कार्ये केली आहेत. हयात खान आणि त्याची टीम लगेचच घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केले. त्यांनी मगरीचा हल्ला रोखण्यासाठी प्रथम त्याच्या तोंडावर टेप लावला, नंतर त्याचे पुढचे आणि मागचे पाय दोरीने बांधले आणि नंतर त्याला घराबाहेर काढले. बचाव कार्य जवळजवळ एक तास चालू होते. रात्री ११ वाजता सुमारे ८० किलोग्रॅम वजन आणि आठ फूट लांबीचा मगर खांद्यावर घेऊन घराबाहेर पडले.
त्यानंतर शनिवारी सकाळी गेटा परिसरातील चंबळ नदीत सरपटणाऱ्या प्राण्याला सुरक्षितपणे सोडण्यात आले.गेल्या वर्षभरात बंजारी गावातून अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे; असे हयात यांनी स्थानिक पत्रकारांना सांगितले. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, गावासमोरील एक तलाव मगरींचे घर बनले आहे; ज्यामुळे दैनंदिन जीवन कठीण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून, या मगरींमुळे तलावाचे पाणी वापरण्यास भीती वाटते. त्यामुळे नागरिक प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी करत आहेत. त्यांना योग्य कुंपण किंवा या मगरींचे स्थलांतर आवश्यक आहे,” ; असे एका रहिवाशाने इंडिया टुडेला सांगितले आहे…