Brother Sister Raksha Bandhan Emotional Video : आयुष्यात उचललेले एक चुकीचे पाऊल व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करते, व्यक्तीला गुन्हेगार बनवते. एक गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगतानाचे क्षण इतके त्रासदायक असतात की, कुटुंबालाही त्याचे ओझे सहन करावे लागते. भाऊ गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगत असताना कुटुंबातील सगळ्यांना त्याचं दु:ख वाटतं असतं. विशेषत: रक्षाबंधन, भाऊबीजसारख्या सणाला आई, बहिणीला हे दु:ख पचवणं फार कठीण जातं. रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहीण-भावाचा असंच एक हृदय पिळवटून टाकणारं दृश्य समोर आलं आहे, ज्यात रक्षाबंधनानिमित्त बहिणी तुरुंगात असलेल्या भावाला राखी बांधायला आल्या. त्यावेळी भावाला पाहून बहिणींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पाहून तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनाही भावना अनावर झाल्या. सुरत तुरुंगातील हे दृश्य आहे.

तुरुंगात असे अनेक कैदी असतात, ज्यांच्याकडून एका क्षणी असे काही पाऊल उचलले गेले की, त्यांचे आयुष्य कायमचे बदलले. एक चूक, एक क्षणिक राग आणि नंतर वर्षानुवर्षे शिक्षा; पण ही शिक्षा केवळ त्या कैद्यालाच सहन करावी लागत नाही, तर त्याच्या कुटुंबालाही सहन करावी लागते. आई-वडील, बहीण, पत्नी आणि मुलं अशा सर्वांनाच त्या एका चुकीची किंमत मोजावी लागते. शिक्षेचे हे दुःख फक्त तुरुंगाच्या भिंतींपुरते मर्यादित नसते; तर ते प्रेम आणि विश्वासाच्या धाग्याने बांधलेल्या प्रत्येक नात्याला स्पर्श करते.

सुरत तुरुंगातील रक्षाबंधनाचा असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे. बहिणी आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी तुरुंगात पोहोचल्या. पण, त्यावेळी प्रत्येकीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपला भावाला त्या परिस्थितीत पाहून अनेकींच्या भावनांचा बांध फुटला. रडून मिठी मारत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तुरुंगातील कठोर आयुष्य जगत असताना भावना दाबून ठेवणारे भाऊदेखील आपल्या बहिणींना पाहून रडू लागले. हे दृश्य इतके भावनिक होते की, तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांतही पाणी तरळले. यावेळी गणवेशातील एका खऱ्या बहिणीच रूप पाहायला मिळालं. पोलीस अधिकारी असली तरी तीपण कोणाची तरी बहीण, कोणाची तरी मुलगी आहे. असे दृश्य आपल्याला जाणीव करून देते की, खरंच अद्यापही माणसातली माणुसकी, भावना अस्तित्वात आहेत; मग त्या तुरुंगात पोलिस असोत किंवा बाहेरील.

बहीण-भावाच्या नात्यातील भावनिकता दृगोचर करणाऱ्या क्षणाचा हा व्हिडीओ @rajankushwaha66 इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “महिला पोलिस बहिणीला सलाम,” तर कोणी म्हटले, “माणसे एकमेकांबरोबर प्रेमाने राहावेत, अशी माझी इच्छा आहे.” दुसऱ्या एकाने म्हटले, “गणवेशातही एक माणूस असतो, तीही कोणाची तरी बहीण आहे.” या प्रतिक्रियांवरून असे दिसून येते की, हा व्हिडीओ लोकांना केवळ भावनिकच करीत नाही, तर चुका आणि परिस्थिती माणसाला कुठे घेऊन जाऊ शकते याचा विचार करण्यासही भाग पाडत आहे.