महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६२ वा वाढदिवस. राज्यातील करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपण वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, असं आवाहन अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात, अशा सूचनाही अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सोशल नेटवर्किंगवरुन शुभेच्छा दिल्या जात असल्या तरी आजच्या वृत्तपत्रामध्ये २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीनंतर घडलेल्या घटनाक्रमासंदर्भात अजित पवारांची माफी मागणारी एक जाहिरात छापून आली आहे आणि ती जाहिरात सध्या प्रचंड चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की पाहा >> वाढदिवस विशेष: सकाळच्या शपथविधीपासून लसीपर्यंत अन् गल्लीपासून दिल्लीपर्यंत… अजितदादांचे चर्चेत राहिलेले डायलॉग

आज मुंबईतील वृत्तपत्रांमध्ये अजित पवारांना शुभेच्छा देणारी हे माफीनामा वजा जाहिरात छापली आहे मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी. २०१९ मध्ये घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देत देशमुख यांनी, “दादा, आता सहन होत नाही,” म्हणत रिटर्न गिफ्ट म्हणून माफीच द्या अशी विनंती केलीय. “दादा, तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक, माफ करा. तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल नव्हता इरादा. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी माझ्या हातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या. दादा, मी अपरपक्व होतो. भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली. दोन वर्षे मी स्वत:ला पाश्चातापाच्या अग्निकुंडात झोकून दिले आहे. पण दादा, आता सहन होत नाही. संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छारुपी आदरभाव व्यक्त करतोय. मलाही दादा आझ मन मोठं करुन आशिर्वादरुपी माफीचं रिटर्न गिफ्ट द्या. एवढीच माफक अपेक्षा,” असं या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे.


काय घडलं होतं?

२०१९ साली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस २३ नोव्हेंबर रोजी पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अवघ्या काही दिवसांनंतर राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला. फडणवीसांना अवघ्या ८० तासांमध्ये राजीनामा द्यावा लागल्याने सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता. पहाटेच्या या शपथविधीवरुन बराच राजकीय गोंधळ निर्माण झालेला. यावेळी अजित पवारांनी असं का केलं?, नक्की काय घडलं यासंदर्भात ज्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवशी संभ्रम कायम होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी करुन सरकार स्थापन करण्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये असताना पहाटे फडणवीसांनी शपथ घेतल्याने सर्व अंदाज फोल ठरले होते. अजित पवार काय करणार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष्य लागलेलं होतं. त्याच दिवशी राष्ट्रवादीने यशवंतराव चव्हाण  प्रतिष्ठानमध्ये तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी नितीन देखमुख यांनी प्रतिष्ठानच्या इमारतीबाहेर अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यासाठीच त्यांनी आज जाहिरात छापून माफी मागितली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp supporter says sorry to ajit pawar ask for forgiveness as return gift scsg