भाजपाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे ट्विटवर प्रचंड अॅक्टीव्ह आहेत. अनेक घडामोडींवर ते ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना दिसतात. अनेकदा ते राज्य सरकारवर आणि खास करुन शिवसेनेच्या नेत्यांवर ट्विटरच्या माध्यमातून टीका करताना दिसतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो किंवा शिवसेनेचे खासदार संजय राऊत असो निलेश राणे ट्विटवरुन सर्वांबद्दलच बोलताना दिसतात. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवरही अनेक बातम्यांवर निलेश राणे ट्विटरच्या माध्यमातून आपले मत मांडताना दिसतात. ट्विटरमुळे निलेश राणे बातम्यांमध्येही कायम चर्चेत असतात. मात्र सोमवारी (११ मे २०२० रोजी) त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोवर त्यांनाच अनेकांनी ट्रोल केलं आहे.
झालं असं की निलेश राणे यांनी एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये एका रिक्षात तीन माकडे बसल्याचे चित्र दिसत आहे. यापैकी एका माकडाच्या हाती रिक्षाचे हॅण्डल आहे तर दुसरी दोन माकडे मागे बसलेली दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करताना निलेश राणे यांनी, “तिघ बसलेत पण चालवायला तिघांना येत नाही” अशी कॅप्शन दिली आहे.
तिघ बसलेत पण चालवायला तिघांना येत नाही. pic.twitter.com/3dIeklWcYw
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 11, 2020
अर्थात या ट्विटवरुन निलेश यांना राजकीय टीका करायची होती या फोटो खालील काही कमेंटवरुन स्पष्टपणे दिसून येत आहे. राणे यांना महाविकास आघाडीतील तीन पक्षांवर निशाणा साधण्याच्या हेतून हा फोटो टाकला होता. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी या सरकारचा उल्लेख ‘तीन चाकांचे सरकार’ असा केला होता. तसेच हे सरकार जास्त काळ टीकाणार नाही, असंही आठवले यांनी म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर काही जणांनी कमेंटमधून या फोटोचा संबंध महाविकास आघाडीशी जोडला आहे. मात्र अनेकांनी यावरुन निलेश राणे यांनाच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. राणेंनी पोस्ट केलेल्या ‘तिघ बसलेत पण चालवायला तिघांना येत नाही’ हा कॅप्शनचा धागा पकडून अनेकांनी राणेंवर टीका करणाऱ्या कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे. तुम्हीच बघा या कमेंट…
या फोटोवर राणे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या नेटकऱ्यांनी मिळून साडेतीनशेहून अधिक जणांनी कमेंट केल्या आहेत.