Gurgaon flooded video viral: उत्तर भारतात दिल्ली, गुरुग्राम आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेष करून गुरुग्रामला पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. गुरुग्राममधील उच्चभ्रूंच्या वस्त्यातही पाणी शिरलं असून घराघरात पाणी तुंबल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. चार तासांच्या पावसानंतर गुरुग्राममध्ये जागोजागी तळी साचली. गुरुग्राममधील एका महिलेने तिच्या घरात साचलेल्या पाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. घरातील महागड्या वस्तू पाण्यात तरंगताना यात दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून उच्चभ्रूंनाही भ्रष्ट नगर नियोजनाचा कसा फटका बसला याची चर्चा होत आहे.

गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स मार्ग परिसरात राहणाऱ्या सांची अरोरा नामक महिलेनं आपली व्यथा इन्स्टाग्रामवर व्हिडीओसह शेअर केली. याठिकाणी अेक उच्चभ्रू लोक राहतात. अरोरा यांनी म्हटलं, “मागच्या रात्री जे घडलं त्यामुळे मला मोठा धक्का बसला. मी ज्याठिकाणी राहते, तो परिसर उच्चभ्रूंचा समजला जातो. याठिकाणी १०० कोटींचीही घरे आहेत. पण तरीही पायाभूत उपाययोजना नसल्याचं वास्तव आम्हाला दिसलं. हेच गुरुग्रामचं दाहक वास्तव आहे.”

अरोरा यांनी पुढे म्हटलं, “मी काल जेव्हा घरी परतले, तेव्हा मला दिसलं की माझी गाडी पाण्यात तरंगत होती. त्याहून मोठा धक्का घरात गेल्यावर बसला. माझ्या घरात पाणीच पाणी साचलं होतं. त्या गढूळ पाण्यात आमचं फर्निचर, वस्तू तरंगत होत्या. भिजल्यामुळं सर्वच वस्तू खराब झाल्या. व्यक्त व्हायला आता माझ्याकडे पुरेसे शब्दही नाहीत. उरलंय फक्त दुःख आणि पश्चाताप. हे फक्त पाण्यामुळं झालेलं नुकसान नाही तर भावनिक नुकसानही आहे. घरातलं पाणी ओसरलं तरी हे दुःख ओसरणार नाही.”

सांची अरोरा यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली, तसंच त्यांचं सांत्वनही केलं. गुरुग्रामच्या पायाभूत सुविधा, ड्रेनेज व्यवस्था आणि ढिसाळ शहर नियोजन यावर अनेकांनी टीका केली.

१० कोटी रुपये असतील तर विदेशात जा

एका युजरने सांची अरोरा यांच्या पोस्टखाली कमेंट करत म्हटले, “जर कुणाकडेही १० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक पैसे असतील तर त्यांनी विदेशात जाऊन स्थायिक व्हावे. तिथं तुम्ही कर भरला तर तुम्हाला प्रतिष्ठेत, सुरक्षा आणि चांगल्या पायाभूत सुविधांसह आरामात जगता येतं. भारतात कोणतंही धोरण नाही, सामाजिक ध्रुवीकरण आणि खूप भ्रष्टाचार आहे. तसंच सर्वच राजकारणी सारखेच आहेत.”

दुसऱ्या एका युजरने गुरुग्राममध्ये सुरू असलेल्या अनियंत्रित बांधकाम व्यवसायाकडे बोट दाखवले. “जेव्हा तुम्हाला रिअल इस्टेटचा विकास करण्याची, भूखंड आणि शेतजमिनी विकून पैसे कमविण्याची हाव लागते आणि यासाठी नियोजन व मूलभूत मानवी गरजांचा बळी दिला जातो, तेव्हाच असं घडतं”, अशी कमेंट या युजरनं केली.