भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गांधी आणि नेहरु यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन निशाणा साधाला. सामना वृत्तपत्रामधील अग्रलेखात “कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांच्यामुळे. ७० वर्षांपासून पंडित नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प आणि आत्मविश्वासावरच,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं होतं. यावरुनच पात्रा यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. मात्र अनेकांनी पात्रा यांनाच ट्रोल केल्याचं चित्र दिसत आहे.

नक्की पाहा >> Photos: ‘करोना येणार…’; २०१३ सालीच त्यानं वर्तवलेलं भाकित, त्या पोस्टमुळे जगभरात खळबळ

शिवसेनेनं केलेल्या टीकेची इंग्रजी बातमीवर प्रतिक्रिया देताना पात्रा यांनी, “हे चूकून छापलं आहे की ते खरोखर असं म्हणालेत?” असं ट्विट केलं. पात्रा यांनी कोट करुन रिट्विट केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो होता.


मात्र या ट्विटवखालील प्रतिक्रियांमध्ये भाजपा समर्थक विरुद्ध विरोधक असं शाब्दिक युद्ध रंगल्याचं दिसत आहे. त्यामध्येही पात्रा यांना ट्रोल करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. नायक हसन नावाच्या एका युझरने, “भारत गांधी-नेहरु यांनी बनवलेल्या योजनांवर पुढे जात आहे की नाही ठाऊक नाही, मात्र मोदी आणि शाह यांच्यामुळे भारत मरतोय हे मात्र नक्की,” असा टोला लगावला आहे. गौरव जैन नावाच्या व्यक्तीने, “मोदी देशाला एवढ्या उंचीवर घेऊन गेलेत की आता ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागलीय. मात्र ही गोष्ट मोदीविरोधकांना समजणार नाही” असा असा उपरोधिक टोला लगावलाय.

निलेश शर्मा यांनी, “सत्य कटू असतं. लसीसुद्धा काँग्रेसने निर्माण केलेल्या संस्थांमध्येच तयार केल्या जात आहेत. ऑक्सिजनसुद्धा काँग्रेसने निर्माण केलेल्या नवरत्न कंपन्यांमध्ये तयार होत आहे. उपचारही काँग्रेसने तयार केलेल्या रुग्णालयांमध्ये सुरु आहेत. भाजपा आणि मोदींनी तयार केलेली जगातील सर्वात उंच काँग्रेस नेत्याचा पुतळा काही उपयोगाला आला नाही,” अशी टीका केलीय.

सुधीर झा यांनी, “तुमचे ट्विट आता घृणास्पद वाटू लागलेत. जरा तरी लाज शिल्लक ठेवा. करोनाबाधितांची जरा मदत करण्याचं बघा,” अशा शब्दांमध्ये पात्रा यांना सुनावलं आहे. इरशाद यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर, ‘लोक सायकल, रिक्षा आणि ऑटोंमधून मृतदेह घेऊन जात आहेत. भाजपा नेते आणि खासदार राजीव प्रताप रुढी यांच्या घरी रुग्णवाहिकेतून वाळू वाहून नेली जात आहे,’ असा मजकूर लिहिलेला आहे.

एकीकडे पात्रा यांना ट्रोल केलं जात असतानाच दुसरीकडे काहींनी पात्रा यांची बाजू घेतल्याचंही दिसत आहे. “आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही करुन ठेवलं आहे, ते सर्व त्यांची पुढील पिढी संपवत आहे,” असं एकाने म्हटलं आहे. तर उदय उपाध्याय यांनी, “बाळासाहेबांना हे वक्तव्य पाहून किती वाईट वाटलं असेल. मात्र ते आमच्या हृदयात कायम असतील,” असं म्हटलं आहे.