Shocking Road Accident Video : अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की गायी, म्हशी, बैल किंवा इतर प्राणी रस्त्यावर किंवा कडेला बसून आराम करत असतात. यामुळे वाहनचालकही एखादं गाव जवळ असल्याचे समजताच आपल्या वाहनाचा स्पीड कमी करतात. पण, अनेकदा भरधाव वाहनांच्या धडकेत रस्त्याच्या मधोमध बसलेल्या प्राण्याच्या अपघाताच्या घटना घडताना दिसतात. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक बैल वाईटप्रकारे एका कारच्या धडकेत अपघातग्रस्त झाला. असा अपघात तुम्हीदेखील कधी पाहिला नसेल, अनेकांना अपघाताचा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला आहे.

हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील शिमला-मतौर राष्ट्रीय महामार्गावरील हा अपघाताचा व्हिडीओ आहे, ज्यात एक भरधाव कार रस्त्याच्या मधोमध बसलेल्या भटक्या बैलाला अक्षरश: चिरडून पुढे काही अंतर घसपटत घेऊन जाते. हा एक अतिशय भयानक अपघात आहे.

व्हिडीओत पाहू शकता, रात्रीची वेळ आहे, एक बैल आरामात रस्त्याच्या अगदी मधोमध झोपलाय, याचवेळी एक भरधाव कार येते आणि बैलाला थेट चिरडत घसपटत काही अंतर पुढे घेऊन जाते. या घटनेत बैल गंभीररित्या जखमी होतो, त्यामुळे वेदनेने कळवळत तो रस्त्यावरचं पडून राहतो, यावेळी त्याला धड उभंही राहता येत नव्हते ना चालताही येत नव्हते. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पण, त्यानंतर संबंधित रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक गाड्या बैलाला वाचवण्यासाठी मार्ग बदलताना दिसल्या. पण, कोणीही थांबून त्या बैलाची मदत केली नाही, ज्यामुळे कारचालकावर आता स्थानिक लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अनेक जण चालकाच्या निष्काळजीपणाविरुद्ध संताप व्यक्त करत आहेत. बिलासपूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे रस्ते सुरक्षा आणि भटक्या प्राण्यांच्या समस्येवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. डीएसपी बिलासपूर म्हणाले की, अपघाताचा तपास सुरू आहे आणि चालकाला लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.