Shocking Video: आई आणि तिच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. अगदी जन्म दिल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांना सांभाळते, त्यांचं रक्षण करते. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.

आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी आईचा जीव वर-खाली होतो. अशा वेळेस जर आपल्याच डोळ्यांसमोर लेकराचा जीव धोक्यात सापडला तर… सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात आई आणि चिमुकल्याला भयंकर अपघात होतो.

व्हायरल व्हिडीओ (Mother Saved Child Video)

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा धक्कादायक व्हिडीओ पाहून सगळ्यांच्याच काळजात धडकी भरली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका बाईकवर चालकाच्या मागे एक आई तिच्या लहान बाळाला घेऊन बसली आहे. तितक्यात अचानक समोरून एक भरधाव ट्रक येतो. या ट्रकच्या धडकेनं आई आणि लेकरू रस्त्यावर पडतं. या भयंकर अपघातात ट्रकचं चाक लेकराच्या अंगावरून जाणार इतक्यात आई लेकराला मागे खेचते आणि त्याचा बचाव करते. स्वत: संकटात असतानादेखील ती तिच्या लेकराचा जीव वाचवते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @shubham_creator_07_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल चार मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. तसेच ‘शेवटी आई ती आईच असते, स्वत: मरणाला आडवं जाऊन ती लेकराचा जीव वाचवते’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “सुखद गोष्ट ही की आई आणि मूल दोघेही सुरक्षित राहिले.” दुसऱ्याने, “स्वतः चा विचार न करता, नि:स्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती – आई”, अशी कमेंट केली. तिसऱ्याने कमेंट करीत लिहिले, “देव दिसत नसला तरी तो कुठूनपण येतो हे सत्य आहे आज समजलं.”