देश-राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली ज्यामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. पण पुणेकरांसाठी पावसाळा तोपर्यंत सुरु होत नाही जोपर्यंत भिडे पूल पाण्याखाली जात नाही.दरवर्षी पाऊस सुरु झाला की सर्वांचे लक्ष असते ते भिडे पूलाकडे कारण धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडला की खडकवासला धरण भरते म्हणजे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटते. त्यानंतर खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले जातात त्यानंतर मुळा-मुठेच्या पाण्याची पातळी वाढते. मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर सर्वात आधी भिडे पूल पाण्याखाली जातो आणि नदीपात्रातील रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात येतो. हा क्रम ठरलेला आहे. जोपर्यंत भिडे पूल पाण्याखाली जात नाही तोपर्यंत पुणेकर बिनधास्तपणे शहरातून फिरताना दिसतात.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेकरांचे लक्ष भिडे पूलाकडे लागले आहे. मुसळधार पाऊस कायम असल्याने खडकवासला धरणातून आज सकाळी ७.०० वाजल्यापासून मुठा नदीपात्रात ९ हजार ४१६ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आहे. खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर खडकवासला धरणाचे दरवाजे उघडल्याचे आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान आता नदीपात्राच्या रस्त्यावर पाणी शिरल्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून नदीपात्रातील रस्ते बंद केले आहेत. नदी पात्राच्या रस्त्याची वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवण्यात आली आहे.

हेही वाचा – कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यात व्हॉलीबॉल खेळत आहेत हे तरुण, Viral Video पाहून आठवतील बालपणीचे दिवस

भिडे पूल ते रजपूत वस्ती दरम्यानचा नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. कोथरूड, सिंहगड रस्ता, कर्वेनगर भागातून येणाऱ्या नागरिकांनी नदीपात्रीतील रस्त्याचा वापर करू नये. तसेच पेठांमधून कोथरूडकडे किंवा सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या नागरिकांनी इतर पर्याय रस्त्याचा वापर करावा असे आवाहन केले जात आहे.

हेही वाचा – नागपूरमध्ये हे काय सुरू आहे? शुद्धीत नसलेल्या मैत्रिणीला मदत करायला गेला अन् तिला घेऊन धाडकन आपटला

दरम्यान भिडे पूल पाण्याखाली गेल्याचे दावा करणारे अनेक व्हिडिओ समोर आले आहे. इंस्टाग्रामवर kothrudkarpune नावाच्या पेजवर असाच एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये भिडे पूलाच्या पातळीला नदीचे पाणी आल्याचे स्पष्ट दिसत आहे. पण अद्यापही भिडे पूलावरून वाहनांची ये-जा सुरु आहे. पण कोणत्याही क्षणी नदीपात्रातील पाणी वाढू शकते आणि भिडे पूल पाण्याखाली जाऊ शकतो त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले जाते.

दरम्यान “भिडे पूल पाण्याखाली जाणे म्हणजे पुणेकरांसाठी एक सोहळा आहे” अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. “भिडे पूल पाण्याखाली गेल्याशिवाय पुण्यात पावसाळा सुरु झाला हे अनेक पुणेकर मान्य करत नाही” असेही मत अनेकांनी व्यक्त केले.