Ranthambore Safari Incident: राजस्थानातील रणथंबोर टायगर रिझर्व्ह… जिथे हजारो लोक वन्यजीवनाचा थरार अनुभवण्यासाठी गर्दी करतात. राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्क हे वाइल्ड लाइफ सफारीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. वाघ पाहण्याची रोमांचक संधी मिळावी म्हणून हजारो पर्यटक दरवर्षी तेथे भेट देतात. पण, नुकत्याच घडलेल्या एका घटनेने हा रोमांचक प्रवास एका कुटुंबासाठी भयानक स्वप्नात बदलला. अहवालानुसार, जवळपास २० जणांचा एक समूह जंगल सफारीसाठी गेला होता. मात्र, सफारी गाईड आणि ड्रायव्हरच्या बेजबाबदारपणामुळे हे सर्व जण जीवघेण्या परिस्थितीत अडकले होते.
जंगलात खराब झाली बस अन् गाईडचे पलायन
पर्यटक ज्या उघड्या बस (कॅन्टर)मधून प्रवास करीत होते, ती बस अचानक जंगलाच्या मध्यभागीच बंद पडली. वाहन खराब झाल्यानंतर तणावग्रस्त पर्यटक मदतीची वाट पाहत होते. त्याच वेळी गाईड प्रवाशांशी उर्मटपणे वागला आणि दुसरी बस (कॅन्टर) आणतो, असं सांगून तो तिथून निघून गेला. पण, परत येण्याऐवजी तो त्यांना जंगलात एकाकी सोडून पळून गेला.
घनदाट जंगल, अंधार आणि रडणारी मुलं
रणथंबोर टायगर रिझर्व्हमध्ये ६० पेक्षा जास्त वाघ आहेत. रात्रीचा अंधार, घनदाट जंगल आणि जंगली प्राण्यांची उपस्थिती; एकंदरीत ती सगळी परिस्थिती भयानक होती. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, लहान मुलं भीतीनं रडत होती, महिला मदतीसाठी ओरडत होत्या आणि त्यांचा एकमेव आधार होता मोबाईलची फ्लॅशलाइट. प्रत्येक क्षण भीतीनं ग्रासलेला आणि मृत्यूची सावली डोक्यावर असल्यासारखा वाटत होता.
प्रशासनाची तत्काळ कारवाई
घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रणथंबोर पार्क प्रशासन याबाबत आवश्यक ती कारवाई केली. उपवनसंरक्षक प्रमोद धाकड यांनी सांगितलं की, चौकशी पूर्ण होईपर्यंत कन्हैया, शहजाद चौधरी, लियाकत अली या तीन बसचालकांसोबत गाईड मुकेश कुमार बैरवा यांना रणथंबोर पार्कमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
रणथंबोरचे वन्य जीवन
रणथंबोर टायगर रिझर्व्ह केवळ वाघांसाठीच नव्हे, तर बिबळ्य, सुस्त अस्वल, मगर, वाळवंटी कोल्हा, तसेच अनेक दुर्मीळ पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. याच आकर्षणामुळे जगभरातून हजारो पर्यटक तेथे येतात. मात्र नुकत्याच घडलेल्या या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
थोडक्यात सांगायचं तर, जिथे लोक वाइल्ड लाइफच्या रोमांच अनुभवण्यासाठी येतात, तिथेच एका कुटुंबानं सर्वांत भयानक अनुभव घेतला.