shocking video: चोरी आणि लूटमारीच्या घटना आता समाजात नव्या स्वरूपात समोर येत आहेत. दिवसाढवळ्या दुकानात, रस्त्यावर किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणीही गुन्हेगार विविध युक्त्या वापरून चोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. काही वेळा हे लोक ग्राहक, डिलिव्हरी बॉय किंवा अगदी मदतीची गरज असलेले सामान्य नागरिक असल्याचं भासवत लोकांची फसवणूक करतात. अशातच अहमदाबादमधून एक घटना समोर आली आहे

अहमदाबादमधली ही घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शहरातील एका ज्वेलरी दुकानात एक महिला ग्राहक बनून आली आणि दुपारीच चोरी करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ती साध्या ग्राहकासारखी गप्पा मारत होती; पण काही क्षणांतच तिने दुकानदाराच्या डोळ्यांत लाल मिरची टाकली आणि दागिने घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत.

‘Robbery Viral CCTV Footage’ या नावाने व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अहमदाबादमधील ज्वेलरी शॉपमध्ये घडलेल्या लुटीच्या प्रकरणाचा आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, एक महिला ग्राहक असल्याचे भासवीत दुकानात प्रवेश करते. ती काही मिनिटे मालकासोबत गप्पा मारत राहते, काही दागिने पाहण्याची मागणी करते आणि योग्य क्षण साधून दुकानदाराच्या डोळ्यांत लाल मिरची पावडर फेकते.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, दुकानदार अचानक डोळ्यांत मिरची गेल्याने मागे सरकतो. पण त्याने धैर्य न हरवता, तत्काळ सतर्कता दाखवून, त्या महिलेला पकडले. सांगितले जाते की, दुकानदाराने तिचा हात घट्ट धरला आणि तिला १८ वेळा चापट मारली, जोपर्यंत इतर लोक मदतीला येत नाहीत. महिलेने सोने लुटण्याचा प्रयत्न केला असला तरी तिचा डाव फसला आणि शेवटी तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुकानातील कर्मचाऱ्यांनीही मालकाच्या धाडसाचे कौतुक केले.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरत आहे. अनेकांनी दुकानदाराच्या धैर्याचे आणि त्याने दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक केले आहे. काहींनी म्हटले, “अशा प्रसंगी प्रत्येकानं दुकानात सुरक्षा व्यवस्थेची काळजी घ्यायला हवी.” तर काहींनी सावधगिरीचा सल्ला देत म्हटले, “हिंसक प्रतिक्रिया देण्यापेक्षा अशा घटनांमध्ये तत्काळ पोलिसांना कळवावं.” अनेक व्यापाऱ्यांनीही या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे.

या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की, गुन्हेगारीचा चेहरा बदलत आहे. आता अपराधीही सामान्य माणसांच्या रूपात समोर येत आहेत. त्यामुळे सतर्क राहणे आणि प्रत्येक ग्राहकाकडे जागरूकतेने पाहणे हेच आजच्या काळातले खरे शहाणपण आहे.