shocking video: आजकाल सोशल मीडियावर शाळांमधले व्हिडीओ खूूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. काही व्हिडीओ विद्यार्थ्यांच्या कौतुकाचे असतात, तर काही समाजाचे लक्ष वेधून घेतात. काही व्हिडीओ शिक्षकांचे वर्तन, शाळेची परिस्थिती आणि शिक्षण व्यवस्थेचे वास्तव याबद्दलही प्रश्न उपस्थित करतात. अशातच सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने शिक्षण क्षेत्रातील नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

या व्हिडीओमध्ये एका शाळेतील वर्गात दोन लहान विद्यार्थी शिक्षिकेचे पाय दाबताना दिसत आहेत. शिक्षिका मोबाईलवर बोलत असताना मुली तिच्या पायांवर मालिश करीत असल्याचे दृश्य पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, अशा शिक्षिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे

व्हायरल झालेल्या व्हिडीओत शिक्षिका सुजाता खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत मोबाईलवर बोलत आहे आणि तिच्यासमोर दोन लहान विद्यार्थिनी तिच्या पायांना मालिश करीत आहेत. त्याबद्दल शिक्षिकेच्या चेहऱ्यावर कुठलाही अपराधी भाव दिसत नाही. ती अगदी सहजतेने विद्यार्थिनींकडून ही कामे करून घेत आहे. या व्हिडीओने शिक्षण व्यवस्थेतील काही कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि अहंकारी दृष्टिकोन पुन्हा एकदा समोर आणला आहे.

हा व्हिडीओ बंडापल्ली गावातील जी.टी.डब्ल्यू.ए.एच. या शाळेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शिक्षिका वाय. सुजाता यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्राची प्रतिष्ठा मलीन करणारी ही घटना पालक आणि समाजामध्ये संतापाची लाट निर्माण करणारी ठरली आहे.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्विटर @YSRCParty या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण खात्याने या प्रकरणाची तत्काळ चौकशी सुरू केली आणि शिक्षिका सुजाता यांना निलंबित केल्याचे आदेश जारी केले. आदेशात नमूद करण्यात आले आहे की, सुजाता यांनी अनेक वेळा शासकीय नियमांचे उल्लंघन केले आहे. वर्गात बसण्याची गैरशिस्त, विद्यार्थिनींकडून वैयक्तिक कामे करून घेणे, तसेच मोबाईल फोन वापरणे हे त्यांच्या निष्काळजीपणाचे आणि व्यावसायिक दुर्लक्षाचे लक्षण आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर नागरिक, पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत अनेकांनी अशा शिक्षकांना तत्काळ कामावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. काहींनी या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले आहे. तर, अनेकांनी, शिक्षण ही पवित्र जबाबदारी असल्याचे सांगून अशा प्रकारच्या वर्तणुकीविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

समाजमन असा विचार व्यक्त करीत आहे की, ही घटना केवळ एका शिक्षकाची चूक नाही, तर शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी आणि मूल्यव्यवस्थेचा ऱ्हास दर्शवते.