छत्तरपूर (मध्य प्रदेश) येथे सरकारी शाळेत झालेल्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिकायला शाळेत गेलेल्या लहान मुलांकडून झाडू आणि लादी पुसतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात फिरत आहे. आपण नेहमी म्हणतो की, शाळा म्हणजे ज्ञान देण्याचं ठिकाण; पण या व्हिडीओत अगदी उलट चित्र दिसत आहे. पालकांनी आपल्या मुलांना अभ्यासासाठी पाठवलं; पण तिथे त्यांच्याकडून साफसफाईचं काम करून घेतलं जात आहे. हे पाहून सगळेच रागावले आहेत.

हा व्हिडीओ छत्तरपूरमधील डेरापहाडी येथील एका सरकारी शाळेचा असल्याचे समोर आले आहे. मजेशीर म्हणजे ही शाळा थेट जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासमोरच आहे. व्हिडीओमध्ये तीन मुली आणि एक मुलगा शाळेचा गणवेश घालून वर्गात झाडू मारताना आणि लादी पुसताना दिसतात. काही जण झाडू मारत आहेत; तर काही जण जमीन पुसत आहेत. पण, या सगळ्या कामांदरम्यान वर्गात एकही शिक्षक किंवा जबाबदार कर्मचारी दिसत नाही.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यापासून लोकांनी शाळेच्या प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “ही शाळा आहे की साफसफाई मोहीम,” असा प्रश्न अनेकांनी विचारला. पालकांनीही संताप व्यक्त करीत म्हटलं, “आम्ही मुलांना अभ्यासासाठी पाठवतो की सफाई कामगार बनण्यासाठी?” काहींनी म्हटलं की, हा प्रकार शिक्षण पद्धतीलाच लाज आणणारा आहे. तर, काहींनी थेट शिक्षण खात्यानं उत्तर द्यावं, अशी मागणी केली.

पाहा व्हिडिओ

एका व्यक्तीनं कमेंट केली, “जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच हे चालत असेल, तर दुर्गम गावांत काय चालत असेल?” दुसऱ्यानं लिहिलं, “शिक्षक आरामात बसले आहेत आणि मुलं काम करीत आहेत?” मराठी वापरकर्त्यांनीही नाराजी व्यक्त करीत म्हटलं, “शाळेत मुलांनीच काम करायचं, तर मग शिक्षकांचा उपयोग काय?”

या प्रकारानंतर स्थानिक अधिकारी आणि शिक्षण विभागानं याची दखल घेतल्याचं सांगितलं जात आहे; , पण अजूनपर्यंत कुठलीच ठोस कारवाई झालेली नाही. मात्र लोकांचा संताप पाहता, आता तरी त्या शिक्षक आणि शाळेच्या प्रशासनावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सर्व जण करीत आहेत.

छत्तरपूरमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. काहीच दिवसांपूर्वी इथल्या एका सरकारी शाळेत एक शिक्षक वर्गातच बाकावर झोपलेला आढळला होता. तो व्हिडीओही जोरात व्हायरल झाला आणि मग प्रशासनाला कारवाई करावी लागली. त्या शिक्षकाचं नाव जगराम प्रजापती असल्याचं समोर आलं होतं.