cute viral video: सोशल मीडियावर अनेकदा शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमधील नात्याचे सुंदर क्षण व्हायरल होताना दिसतात. शिक्षकांनी वर्गात मुलांसोबत केलेला मजेदार संवाद, त्यांच्यासोबत केलेल्या डान्सचे व्हिडीओ किंवा लहान मुलांच्या निरागस प्रतिक्रिया – हे सगळे नेहमीच लोकांच्या मनाला भावतात. अशाच एका व्हिडीओने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये एका छोट्या विद्यार्थ्याने आपल्या मॅडमवर इतक्या गोड पद्धतीनं प्रेम व्यक्त केलं आहे की, ते पाहून कोणाचंही मन भावूक होईल. इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या या क्लिपने तब्बल तीन दशलक्षांहून अधिक लोकांची मने जिंकली आहेत.

हा व्हिडीओ @nees_shah या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा आपल्या मॅडम कॉपी तपासत असताना त्यांच्यासमोर उभा आहे. मॅडम कॉपी पाहत असताना तो त्यांच्याकडे गोड नजरेने पाहत राहतो. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि निरागस नजर खूप छान वाटते. थोड्याच वेळात तो मॅडमचा दुपट्टा नीट करतो आणि त्यांच्या केसांकडे प्रेमाने पाहतो. हे पाहून मॅडमही हसतात. दोघांमधील हा छोटा आणि गोड क्षण इतका सुंदर आहे की, तो पाहून सगळेच खूश होतात.

पाहा व्हिडिओ

या व्हिडीओवर नेटिझन्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, “वयाचं अंतर काहीही असो, प्रेम निरागस असतं.” दुसऱ्यानं मजेशीरपणे लिहिलं, “प्रत्येक मुलाचं पहिलं क्रश म्हणजे त्याची शिक्षिका!” तिसऱ्या युजरने लिहिलं, “तो मोठा झाल्यावर नक्की सांगेल. मला माझ्या मॅडमवर क्रश होता, ती खूप सुंदर होती.” चौथ्यानं लिहिलं, “त्याच्याकडे आता सांगण्यासारखी एक सुंदर आठवण आहे.” तर एका युजरने म्हटलं, “तो आपल्या शिक्षकाचा खूप आदर करतो, हेच त्याच्या कृतीतून दिसतं.” आणखी एका व्यक्तीनं लिहिलं, “त्यानं मॅडमचा दुपट्टा आणि केस ज्या प्रेमानं ठीक केले, ते पाहून मन भारावलं.”

हा व्हिडीओ फक्त एक गोंडस क्षण दाखवत नाही, तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील निरागस नातं किती सुंदर असतं हेही दाखवतो. आजच्या सोशल मीडियाच्या काळात जिथे अनेक वाईट किंवा नकारात्मक गोष्टी दिसतात, तिथे असे गोड आणि मनाला भावणारे व्हिडीओ लोकांना आनंद देतात. म्हणूनच हा व्हिडीओ लाखो लोकांच्या मनात जागा बनवतोय.