Viral Video Delivery Partner Calls Cops : खूप भूक लागली आहे आणि कमी वेळात काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल, तर आपल्यातील बहुतेक सगळेच जण फूड डिलिव्हरी चापणत्यांकडून आवडीच्या खाद्यपदार्थांची ऑर्डर देतात. त्यानंतर त्यांचे नेमून दिलेले डिलिव्हरी बाॅय आपल्यासाठी काही वेळातच ते खाद्यपदार्थ घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पूर्ण करतो. पण, पार्सल पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला दररोज वेगवेगळ्या ग्राहकांचा सामना करावा लागतो. कोणी पत्ता चुकीचा सांगतो, कोणी सुटे पैसेच देत नाही, तर कोणी विनाकारण चिडचिड करतात. पण, ती माणसंही दिवस-रात्र आपल्या सेवेसाठी धडपडत असतात हे कुठेतरी आपण विसरूनच जातो. आज सोशल मीडियावर असेच काहीतरी घडले आणि एका मद्यधुंद ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला पैसे देण्यास नकार दिला आहे.
शाब्दिक आणि शारीरिक मारहाण (Viral Video)
२९ सप्टेंबर रोजी दिल्लीतील नरेला येथे एक घटना घडली. ’झोमॅटो’कडून एका मद्यधुंद व्यक्तीने जेवण मागवले. जेवण घेऊन डिलिव्हरी बॉय आलाही; पण मद्यधुंद व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला. जेवण मागवणाऱ्या ग्राहकाने डिलिव्हरी बॉयकडून डिलिव्हरी पार्सल घेतले; पण त्यासाठी तो पैसे देण्यास नकार देत होता. डिलिव्हरी बॉय उशिरा आल्याचे कारण देत ग्राहकाने त्याला शाब्दिक आणि शारीरिक मारहाण करण्यास सुरुवात केली. मग डिलिव्हरी बॉयनेही परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांना कळवले.
त्यानंतर पीसीआर टीम घटनास्थळी पोहोचली. तेव्हा त्या फ्लॅटमध्ये दोन माणसं दारू पिऊन पार्टी करीत असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी त्याला गैरवर्तनाबद्दल त्याला ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन पोलिस त्या माणसाला फ्लॅटमधून जबरदस्तीने जिन्यावर आणताना दिसत आहेत. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले आणि त्याची वैद्यकीय तपासणी (MLC) केली. तपासणीत त्याने जास्त प्रमाणात मद्यपान केल्याचे दिसून आले. त्यानंतर तपासणीदरम्यान त्याने आपले नाव राजकुमार असल्याचे सांगितले.
व्हिडीओ नक्की बघा…
पोलिसांच्या अधिकृत निवेदनात, त्या व्यक्तीची खरी ओळख ऋषी कुमार, अशी आहे; जो व्यवसायाने सरकारी शिक्षक आहे. वेळेच्या कमतरतेमुळे डिलिव्हरी बॉयने तक्रार नोंदवली नाही आणि त्यामुळे आरोपीला नंतर सोडण्यात आले. डिलिव्हरी बॉयने अधिकृत तक्रार नोंदविल्यास, त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @KhatriRajeesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.