Viral Video: आई म्हटलं की प्रेम, वात्सल्य, माया, ममता हे शब्द नकळतपणे आपल्या ओठांवर येतात. आई आपल्या मुलांसाठी स्वतःची हौसमौज बाजूला ठेवून, त्यांच्या इच्छा पूर्ण करते. आपले मूल कसेही असले तरी ती त्याच्यावर तितकेच जीवापाड प्रेम करते. समाजमाध्यमावर आई आणि मुलांच्या प्रेमाचे असे अनेक व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हे प्रेम केवळ माणसांमध्येच नाही तर ते प्राण्यांमध्येदेखील पाहायला मिळते. पण आता समाजमाध्यमावर एका आईचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आपली चूक झाल्यावर आपली आईदेखील आपल्यावर चिडते, रागावते किंवा कधीतरी एखादा फटकाही मारते. पण दुर्दैवाने समाजात आपल्या मुलांना सतत मारहाण करणाऱ्यादेखील अनेक माता आहेत. सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अशीच एक विकृत आई पाहायला मिळत आहे; जिला पाहून युजर्स खूप मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये एका घरातील सीसीटीव्ही फुटेज दिसत असून, त्यामध्ये एक आई ११ वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. सुरुवातीला ती मुलाला अनेकदा कानाखाली मारते. त्यानंतर ती मुलाच्या अंगावर बसून, त्याला विकृत पद्धतीने मारते. पुढे त्याच व्हिडीओमध्ये एक जुना व्हिडीओदेखील अॅड करण्यात आला आहे; ज्यात ती आई मुलाला लाथ मारताना दिसतेय. या फुटेजमध्ये मुलाचे वडील मारहाणीदरम्यान हस्तक्षेप करून मुलाला आईपासून वाचवितानाही दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ Xवरील @Voice For Men India या अकाउंटवरून शेअर केला गेला असून, या व्हिडीओवरील कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेय की, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मुलाच्या वडिलांनी शेअर केला असून, त्याच्या पत्नीच्या क्रूर वागणुकीविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली. त्यांनी असा दावा केला की, जेव्हा त्यांनी मारहाणीदरम्यान हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या पत्नीनं विष पिण्याची धमकी दिली.

हेही वाचा: ही तर लेडी पुष्पा! साडी नेसून तरुणीचा ‘पुष्पा पुष्पा’ गाण्यावर जबरदस्त डान्स; Viral Video

पाहा व्हिडीओ:

या प्रकरणानंतर मुलानं आपल्या आईविरुद्ध बाल संरक्षण आयोगाकडे तक्रार केली आहे. त्या अहवालानुसार, बाल कल्याण समितीच्या (सीडब्ल्यूसी) आदेशानंतर सूरजकुंड पोलीस ठाण्यात आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला आपल्या मुलाला घेऊन आईच्या घरी गेली. मुलाने नंतर सीडब्ल्यूसीकडे त्याच्या वडिलांवर ड्रग्जचे व्यसन असल्याचा आरोप केला. सध्या पोलिसांकडून मुलावर नक्की कोण दबाव टाकत आहे याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून, त्यावर नेटकरी खूप मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.