Viral Photo : सासू सुनेचं नातं अनेकदा टोमणे, वाद आणि गैरसमज यासाठी ओळखलं जातं. पण जेव्हा हाच बंध प्रेम, त्याग आणि काळजीने भरतो, तेव्हा तो आई मुलीपेक्षा कमी नसतो. अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी लखनऊत घडली, जिथे सासूने सुनेला मुलगी मानत तिचं जीवन वाचवलं. या घटनेने सासू सुनेच्या नात्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे. लखनऊमधून सासू-सुनेच्या नात्याची एक भावनिक आणि प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. एटा जिल्ह्यातील रामनगर गावातील एका महिलेने आपल्या सुनेला किडनी दान करून, तिचे जीवन वाचवले. या घटनेने सासू सुनेच्या नात्यातील प्रेम, काळजी व जबाबदारी याचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे.
दोन्ही किडन्या ७५% पर्यंत खराब
फारूकाबाद जिल्ह्यातील पूजा यांचा विवाह नोव्हेंबर २०२३ मध्ये एटा येथील अश्विन प्रताप सिंग यांच्याशी झाला होता. फेब्रुवारीमध्ये पूजा यांनी आपल्या कुटुंबात एक गोड बाळाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीच्या वेळी त्यांच्या पोटात गंभीर संसर्ग झाला, ज्यामुळे त्यांच्या दोन्ही किडन्या ७५% पर्यंत खराब झाल्या. त्या गंभीर स्थितीमुळे पूजा यांचे आरोग्य धोक्यात आले. परिवाराने त्यांच्या उपचारासाठी कानपूरसह अनेक रुग्णालयांमध्ये भेट दिली; परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही. अखेरीस, पूजा यांना लखनऊमधील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी स्पष्ट केले की, पूजा यांचे जीवन वाचवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे किडनी प्रत्यारोपण.
या कठीण परिस्थितीत बीनम देवी पुढे आल्या. त्यांचा ब्लड ग्रुप सुनेच्या ब्लड ग्रुपशी जुळत होता आणि त्यांनी त्यांची किडनी दान करण्याचे ठरवले. १३ सप्टेंबर रोजी आरएमएलमध्ये हा किडनी ट्रांसप्लांट यशस्वी झाला. आता पूजा यांना पुढील एक वर्ष डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावे लागणार आहे.
जिथं आईनं नकार दिला तिथं सासू उभी राहिली
फोनवर बोलताना पूजा म्हणाल्या, “माझ्या सासूच्या कारणामुळेच माझा जीवन वाचला आहे. आता मी माझ्या बाळाला घेऊन खेळवू शकते. ईश्वर अशी सासू सर्वांना देवो.” तर बीनम देवी म्हणाल्या, “जेव्हा कोणी मदत करायला तयार नव्हते, तेव्हा मी माझ्या सुनेला किडनी दान केली. आज ती पूर्णपणे बरी आहे आणि तिच्या जीवनात नवीन आशा आहे.” त्या असेदेखील म्हणाल्या, “पूजा माझी सून नाही, माझीच मुलगी आहे.” ही घटना त्यावेळी समोर आली जेव्हा पूजा यांच्या आईने किडनी दान करण्यास नकार दिला होता आणि सासूने पुढे येऊन हे महत्त्वाचे पाऊल उचलले.
ही घटना फक्त सासू-सुनेच्या नात्याची प्रेरणादायी गोष्ट नाही, तर मानवी सहानुभूती, कर्तव्य आणि नि:स्वार्थी प्रेम यांचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. या सकारात्मक घटनेमुळे समाजात सासू-सुनेच्या नात्याबद्दल एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला आहे. बीनम देवीसारख्या व्यक्तीमुळेच अशा संकटाच्या काळातही कुटुंबामध्ये प्रेम, काळजी व जबाबदारीची खरी किंमत दिसून येते.
सामाजिक माध्यमांवर लोकांनी बीनम देवीचे कौतुक केले आहे. ही घटना सर्वांना सासू-सुनेच्या नात्यातील प्रेम आणि नि:स्वार्थी भावनेचे महत्त्व दाखवते. अशा सासू-सुनेच्या नात्यामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो आणि इतरांनाही प्रेरणा मिळते की, संकटाच्या वेळी कुटुंबातील नाते किती मजबूत आणि मोलाचे ठरू शकते.