Foreign couple crying Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक परदेशी पुरुष आणि महिला दिसतात. महिलेनं नुकताच जुळ्या मुलांना जन्म दिला आहे; पण त्या क्षणी आनंदाऐवजी दु:ख आणि धक्का बसल्यासारखी परिस्थिती दिसते. सामान्यतः मूल जन्मल्यावर जोडपं आनंद साजरा करतं; पण या व्हिडीओत मात्र उलटं दृश्य दिसतं. पुरुष मोठमोठ्यानं रडत आहे आणि म्हणत आहे “ही माझी मुलं नाहीत!”

या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, हे जोडपे परदेशी आहेत आणि दोघेही खूप गोरे आहेत. महिलेनं हॉस्पिटलमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर पुरुष दोन्ही बाळांना पाहतो आणि अचानक चकित होतो. कारण- बाळांचा रंग सावळा आहे आणि त्यांच्या केसांचा रंगही काळा आहे. हे पाहून पुरुष ओरडतो की, ही माझी मुलं नाहीत. महिला त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते; पण तिच्या डोळ्यांतही अश्रू आहेत. दोघंही हादरलेले आणि गोंधळलेले दिसतात.

या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं असून, काही सेकंदांतच तो व्हायरल झाला आहे. काहींनी या दृश्यावर प्रतिक्रिया देत लिहिले, “कदाचित रुग्णालयात बाळाची अदलाबदल झाली असावी.” तर काहींनी ही घटना खूप दुःखद असल्याचे म्हटले. पण काही हुशार नेटिझन्सनी लगेचच या व्हिडीओतील विसंगती ओळखली. त्यांनी लक्षात आणून दिलं की, व्हिडीओतील बाळं हलत नाहीत, शरीराची हालचाल अनैसर्गिक आहे आणि प्रकाशयोजना सतत बदलत असते. याचा अर्थ कदाचित हा एआयने तयार केलेला बनावट व्हिडीओ आहे.

पाहा व्हिडिओ

तपासानंतर असे दिसून आले की, हा संपूर्ण व्हिडीओ सोरा किंवा मिडजर्नीसारख्या एआय टूल्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील दृश्ये संगणकाद्वारे तयार केलेली दृश्ये असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लोकांना भावनिक बनवण्यासाठी आणि व्ह्युज वाढवण्यासाठी बनवलेला हा बनावट व्हिडीओ असल्याचं समोर आलं.

लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लिहिलं– “हे खूपच भयानक आहे. हॉस्पिटलमध्ये काय चाललंय?”, तर काहींनी हसत म्हटलं – “ एआयचा कमाल नमुना आहे. आता सत्य आणि खोटं यात फरक करायला सॉफ्टवेअर लागेल.” अनेकांनी या व्हिडीओवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आणि सांगितलं की, आजच्या काळात AI generated content ओळखणं सामान्य लोकांसाठी कठीण झालं आहे. एकूणच, “ही माझी मुलं नाहीत!” असं ओरडून सांगणारा हा व्हिडीओ लोकांच्या भावना हलवतो; पण सत्य इतकंच की, हा वास्तवात घडलेला प्रसंग नसून एआय तंत्रज्ञानाचा फसवा चमत्कार आहे.