punjab viral video: सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट क्षणात व्हायरल होते आणि त्याचे परिणाम कधी हसवतात तर कधी घाबरवतात. असाच एक प्रकार लुधियानामध्ये घडला, जिथे फक्त १३ रुपयांत शर्ट देण्याच्या व्हिडीओने अक्षरशः गोंधळ उडवून टाकला. पंजाबच्या लुधियानामध्ये शुक्रवारी एका कपड्यांच्या दुकानाबाहेर मोठा गोंधळ उडाला. ‘फक्त १३ रुपयांत शर्ट’ देण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेकडो लोक त्या दुकानाबाहेर जमा झाले. गुरु नानक जयंतीनिमित्त ‘स्टाईल फॅशन वर्ल्ड’ या दुकानाच्या मालकाने ही विशेष ऑफर जाहीर केल्याचे सांगितले जाते. पण, या व्हिडीओमुळे इतकी गर्दी जमली की शेवटी पोलिसांना तिथं येऊन परिस्थिती सांभाळावी लागली.

हा व्हिडीओ एका यूट्यूबरने अपलोड केला होता. त्यात दुकानाचे मालक इंद्रदीप सिंग हे म्हणताना दिसतात की, गुरु नानक जयंतीच्या निमित्ताने ग्राहकांना फक्त १३ रुपयांत कोणतेही कपडे जसे की डेनिम, चेक्स किंवा डिझायनर शर्ट — मिळतील. त्यांच्या या घोषणेने लोकांमध्ये खळबळ माजली आणि व्हिडीओ काही तासांतच व्हायरल झाला. अनेकांनी या ऑफरचा फायदा घेण्यासाठी दुकान उघडण्याच्या आधीच दुकानाबाहेर रांगा लावल्या.

व्हिडीओत इंद्रदीप सिंग हे आत्मविश्वासाने सांगताना दिसतात की, ते दर्जेदार कपडे आणि त्यावर गॅरंटी देतील. त्यांचा आवाज आणि बोलण्याची शैली पाहता अनेकांना ही ऑफर खरी वाटली. लोकांनी प्रतिक्रिया देत, “अशी ऑफर कधीच पाहिली नाही”, “हे खरं असेल तर जबरदस्त”, “लुधियानाला जायचं ठरवलं” अशा प्रतिक्रिया दिल्या. काहींनी मात्र “हे लोकांना फसवण्याचा प्रकार आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला.

पाहा व्हिडिओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओनंतर जेव्हा प्रत्यक्षात लोक दुकानात पोहोचले, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. दुकानदाराने सांगितले की ही ऑफर फक्त पहिल्या ५० ग्राहकांसाठी होती. पण, व्हिडीओमध्ये त्याचा उल्लेख नसल्याने लोक संतापले. साधारण १,००० ते १,५०० लोक दुकानाबाहेर जमले आणि गोंधळ सुरू झाला. परिस्थिती बिघडू नये म्हणून दुकानदाराने दुकानाचे शटर बंद केले.

शेवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी हटवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. नंतर इंद्रदीप सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी प्रत्यक्षात ७० ग्राहकांना १३ रुपयांत शर्ट दिले आहेत आणि कोणालाही फसवण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र, लोकांनी व्हिडीओ नीट न ऐकता गैरसमज करून गर्दी केली. पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे की दुकानदाराने खोटी जाहिरात केली होती की फक्त गैरसमजामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.