Metro viral video: सोशल मीडियावर सध्या एक गोंडस, पण विचार करायला लावणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ केवळ हृदयाला स्पर्श करणारा नाही, तर आजच्या समाजातील मानवी संवेदना आणि देखाव्याच्या विचारांवरही प्रकाश टाकतो. शहरातील मेट्रोमध्ये घडलेली ही घटना पाहून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत भावनांचा झरा उमटला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनी एकच गोष्ट मान्य केली – “मानवता अजूनही जिवंत आहे.”

हा व्हिडीओ मेट्रो ट्रेनमधील एका प्रसंगावर आधारित आहे. गर्दीच्या ठिकाणी एक तरुण आपल्या हातात ‘बाळ’ घेऊन जाताना दिसतो. त्याला पाहून, जवळ बसलेली एक तरुणी, मानवतेच्या भावनेने, त्याला तिची जागा देते. तिच्या कृतीवरून तिची संवेदनशीलता दिसून येते; पण पुढे जे घडते, ते सर्व प्रवाशांना आश्चर्यचकित करते.

ती तरुणी तिची जागा सोडून उभी राहिल्यानंतर तो माणूस खाली बसतो; पण काही क्षणांतच सर्वांना कळते की, त्याच्या मांडीवरचे ‘बाळ’ खरे नसून तो एक मोठा टेडी बेअर आहे. ते पाहून त्या तरुणीसह गाडीतील सर्व प्रवासी थोडे आश्चर्यचकित होतात आणि लगेचच हसू लागतात. तरुणीच्या चेहऱ्यावर फजिती झाल्यासारखे स्मित येते. काही क्षणांनंतर तो माणूस पुन्हा उभा राहतो, त्या तरुणीने देऊ केलेली जागा तिला परत देतो आणि तिला मोठा टेडी बेअरही भेट म्हणून देतो. त्या क्षणी मेट्रोचा तो संपूर्ण डबा टाळ्यांचा कडकडाट आणि हास्याने दुमदुमतो.

पाहा व्हिडिओ

या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले– “काही क्षण असे असतात, जे आयुष्यभर लक्षात राहतात. कारण- शालीनतेनं केलेलं काम कधीच वाया जात नाही. दयाळूपणा आणि संयम एकत्र आल्यावर कथा आपोआप सुंदर बनते.” दुसऱ्या एका युजरने लिहिले – “एका स्त्रीनं माणुसकीचा एक सुंदर आदर्श दाखवला. लहानसा प्रयत्न; पण मोठं मन – अजूनही मानवता जिवंत आहे.”

या व्हिडीओमधून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की, जगात अजूनही चांगुलपणा आणि संवेदना शिल्लक आहेत. एखाद्या छोट्याशा कृतीतून एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणता येतं आणि हीच खरी माणुसकी आहे. टेडी बेअरच्या माध्यमातून दिलेला हा छोटासा, पण अर्थपूर्ण संदेश लाखो लोकांच्या मनाला भिडला आहे.