Young Lovers Marriage Viral Video : प्रेम ही भावना कुणाच्याही मनात निर्माण होऊ शकते; पण काही वेळा समाजाच्या दबावामुळे ती अचानक वेगळ्या वळणावर जाते आणि त्याचबरोबर आजच्या या सोशल मीडियाच्या युगात एखादी गोष्ट लपवणे जवळपास अशक्य झाले आहे. त्यातच लहानश्या घटनाही काही तासांत इंटरनेटवर व्हायरल होतात आणि त्यावर समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रियांचे पडसाद उमटतात.
असाच एक प्रकार अलीकडे उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात पाहायला मिळाला. एक जोडपं फिरायला गेले असताना गावकऱ्यांच्या नजरेत आले. त्यानंतर जे घडले, ते धक्कादायक होते. गावकरी आणि कुटुंबीयांनी मिळून या जोडप्याचा मंदिरात लग्न लावून दिले. या लग्नाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, अनेकांनी या घटनेकडे ‘प्रेम प्रकरणावर समाजाचा दबाव’ असे म्हणून पाहिले आहे.
गोंडा जिल्ह्यातील खोदारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (२७ सप्टेंबर) ही घटना घडली. सोनू मौर्य (वय २०) हा तरुण गावात चहाची टपरी चालवतो. त्याच गावातील १९ वर्षांची निशा मौर्य हिच्याशी त्याची ओळख झाली आणि काही महिन्यांतच दोघांचे नाते घट्ट झाले. मात्र, गावकरी किंवा नातेवाइकांना ही गोष्ट कळू नये म्हणून ते गुपचूप भेटत होते. त्या दिवशी दोघे मोटरसायकलवरून फिरायला गेले. फिरून आल्यानंतर त्याने तिला नदीकाठी सोडले. तेव्हा काही गावकऱ्यांच्या नजरेत हे प्रेमी जोडपं आले. त्यांनी ताबडतोब दोन्ही कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली.
पाहा व्हिडिओ
मुलगा–मुलगी एकत्र दिसल्यामुळे गावकरी आणि नातेवाइकांनी “आता फक्त लग्नच करायला हवं”, असा निर्णय घेतला. राम-जानकी मंदिरात त्यांचा विवाह लावण्यात आला. मंदिराबाहेर सोनू आणि निशा यांनी एकमेकांना हार घातले आणि सोनूने निशाच्या कपाळावर सिंदूर लावला. याच वेळी तिथे मोठी गर्दी जमली होती.
सोशल मीडिया वर व्हायरल होणारा हा व्हिडिओ press_atul_yadav इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात दोघे लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसतात. अनेकांनी या प्रकाराला गावकऱ्यांचा अतिरेक म्हटले; तर काहींनी याला योग्य पाऊल ठरवले. सोशल मीडियामुळे ही घटना सर्वत्र पोहोचली आणि तो समाजाच्या चर्चेचा विषय ठरला.