Viral Video: सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; पण हा एक असा व्हिडीओ आहे, जो पाहिल्यावर तुम्हाला धडकी भरेल. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनजवळ रात्री अचानक असं काही घडलं की, रस्त्यावर चालताना किंवा ड्रायव्हिंग करताना तुम्हीही एकदा तरी विचार कराल. एका तरुणाचा पाय उघड्या ड्रेनेजच्या खड्ड्यात अडकला आणि तब्बल चार तासांच्या बचावानंतर त्याची सुटका करण्यात आली.

मुंबईत शुक्रवारी जोगेश्वरी मेट्रो स्टेशनजवळ सिद्धेश नावाच्या तरुणाचा पाय बीएमसीच्या उघड्या ड्रेनेजच्या खड्ड्यात अडकला. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनजवळचा परिसर रात्री शांत असतो; पण, शुक्रवारी काही तरुण तिथे जमले होते आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादात सिद्धेशचा तोल गेला आणि पाय ड्रेनेजच्या खड्ड्यात गेला. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने त्याची सुटका केली.

या घटनेचा एक व्हिडीओ मुंबई टीव्ही या स्थानिक न्यूज पोर्टलने सोशल मीडियावर शेअर केला आणि तो क्षणात व्हायरल झाला. पहाटेच्या काळात रस्त्यावर सुरू असलेला हा बचावकार्याचा व्हिडीओ अनेकांनी पहिला शेअर अन् फॉरवर्ड केला आणि कॉमेंट्सद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

या व्हिडीओखाली आलेल्या प्रतिक्रियांमध्ये दोन गोष्टी ठळकपणे दिसल्या. प्रशासनावरील टीका आणि तरुणाच्या सुटकेबद्दल दिलासा. काहींनी, “हा प्रकार कोणत्याही सामान्य नागरिकाबरोबर घडू शकतो; मग जबाबदार कोण?”, अशी टिप्पणी केली. तर, काहींनी सिद्धेशवर टीका करीत म्हटलं, “दारू पिऊन रस्त्यावर भान हरवले की, असेच प्रकार होतात.” अनेकांनी अग्निशमन दलाच्या कार्याचं कौतुक केलं. “चार तास शांत डोक्यानं आणि जीव धोक्यात घालून प्रयत्न करणं सोपं नाही” अशी लोकांची भावना होती.

दरम्यान, सिद्धेशला सुटकेनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव मोहिमेदरम्यान त्याचा रक्तदाब आणि ऑक्सिजन पातळी खालावल्याने वैद्यकीय मदतीची गरज निर्माण झाली होती. सध्या तो उपचाराखाली असून, स्थिती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.