पालघरमधील घटनेवरुन विरोधकांनी राज्य सरकावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघरमधील घटनेचं राजकारण करु नये असं आवाहन केलं आहे. अकोला येथे आय़ोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटलं की, “पालघर येथील घडलेली घटना ही अतिशय दुर्देवी असून या घटनेचे कुणीही राजकारण करू नये”. याआधी अनिल देशमुख यांनी ट्विट करत उगाचच समाजात/ समाजमाध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलीस आणि सायबर सेलला कठोर कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती दिली होती.
अनिल देशमुख यांनी ट्विट करत सांगितलं होतं की, “मुंबईहून सूरतला निघालेल्या तीघांची पालघर येथील हत्येचीराज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सामील १०१ जणांना अटक करण्यात आलं आहे. तसंच उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. कुणीही या घटनेचं विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे”.
तसंच हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला यापैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत. उगाचच समाजात/ समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलीस आणि सायबर सेलला कठोर कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
हल्ला करणारे व ज्यांच्या वर हल्ला झाला या पैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत. उगाचच समाजात/ समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस व @MahaCyber1 ला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.#LawAndOrderAboveAll
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 19, 2020
आणखी वाचा- पालघरमध्ये घडलेली घटना लांछनास्पद : उद्धव ठाकरे
लॉकडाउन असताना गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्या मुंबई येथील तीन व्यक्तींची दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी 110 ग्रामस्थांना ताब्यात घेतलं असून पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. या दुर्देवी घटनेत मृत्यू झालेल्यामध्ये चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष) व निलेश तेलगडे (30 वर्ष) यांचा समावेश आहे.
आणखी वाचा- पालघर प्रकरणी सोशल मीडियावरुन आगी लावणाऱ्यांना शोधून काढणार – उद्धव ठाकरे
दोन पोलीस अधिकारी निलंबित
जमावकडून तीन जणांच्या हत्या प्रकरणांमध्ये कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्याना निलंबित करण्यात आले आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.