भाईंदर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेने हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘हिंदीची हाक’ देण्यास सुरुवात केली आहे. मात्र या भूमिकेमुळे मराठी भाषिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिरा भाईंदर शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी शहरात विशेष शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हाधिकारी कृष्ण पांचाळ, मिरा भाईंदर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी मूळचे आसाम राज्यातील असलेले आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी मराठी भाषेत भाषण केले. त्यांच्या मराठी भाषेच्या उच्चारणावरून उपस्थितांमध्ये चर्चाही रंगली. त्यानंतर मंत्री सरनाईक भाषणासाठी आले.”मिरा भाईंदर शहर हे सर्व जाती धर्माचे शहर आहे. त्यामुळे मराठी हिंदी वाद काही असो काही काळजी करु नका, उपस्थितांना समजावे यासाठी हिंदीत बोललात तरी हरकत नाही, असे आपण आयुक्तांना सांगितले.
मी स्वत: मराठी आमदार असलो तरी सर्वसामान्य जनतेसोबत बोलत असताना हिंदी बोलण्याची आवश्यकता भासली तर मी हिंदीत बोलतो मला काही फरक पडत नाही. मिरा भाईंदर हे मिनी भारताचे रुप आहे. येथे असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो असे सरनाईक आपल्या भाषणात म्हणाले. मात्र सरनाईक यांच्या या वक्तव्यानंतर मराठी भाषिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली. ज्या ठिकाणी आयुक्त स्वतःहून मराठी बोलत होते, त्यांना हिंदीत बोलण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.
हिंदीची हाक का?
मिरा भाईंदर शहरात केवळ १८ टक्के मतदार हे मराठी भाषिक राहिले आहेत, तर उर्वरित मतदारसंख्येत हिंदी भाषिकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत या मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरनाईक वारंवार हिंदी भाषेच्या समर्थनार्थ वक्तव्य करत असल्याचे दिसून येत आहे.
“मराठी भाषेचे संवर्धन व्हावे म्हणून आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. मात्र जर मंत्री साहेब जाहीरपणे मराठी बद्दल असे वक्तव्य करत असतील तर चुकीचे आहे.उलट आपण मराठी मध्येच बोलायला हवे, ज्याला येत नसेल तो समजून घेण्याचा प्रयत्न करेल. “- संदीप राणे- शहरध्यक्ष ( मनसे- मिरा भाईंदर)