वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा होणार होता. मात्र अचानकपणे हा पाहणी दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका प्रवाशांसह रुग्णांना बसू लागला आहे.
महामार्गावर वर्सोवा ते वसई फाटा दरम्यान सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आहे. त्यातच आता ठाणे तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहाटे ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ठाणे तसेच घोडबंदर भागातील वाहतूक नियंत्रणात आली असली तरी वसई विरार शहराच्या वेशीवर त्याचा मोठा फटका बसू लागला आहे.नुकताच या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून १६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता.
या घडलेल्या घटनेनंतर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. ठाणे, वसई विरार व पालघर या भागात निर्माण होणारी वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारी सकाळी पाहणी दौरा होणार होता.त्यांचा दौरा असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा सुद्धा सज्ज झाल्या होत्या. मात्र ऐनवेळी शिंदे यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
….असे नियोजन नियमित का नाही
महामार्गावर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीची पाहणीच्या करण्यासाठी उपमुख्यमंत्री दाखल होणार असल्याने महामार्गावरील वाहतूक सेवा सुरळीत ठेवण्यात आली असल्याचे चित्र दिसून येत आहे. अवजड वाहने ही महामार्गावर एका बाजूला उभी करण्यात आली होती. त्यामुळे कामासाठी सकाळ सत्रात निघालेल्या नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले.असेच नियोजन वाहतूक नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेने योग्य रीत्या केले असते आज त्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला नसता असे शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांनी सांगितले आहे.