वसई: दिवाळीपूर्वी महावितरणकडून वीजदरात मोठी वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांची दरवाढ लागू करण्यात आली आहे. तर ऐन सणासुदीच्या काळात दरवाढ केल्यामुळे आधीच अनियमित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या वसई विरारकरांनी वीजदर वाढीबाबत संताप व्यक्त केला आहे.

वसई विरार शहरात महावितरण वीज कंपनीच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो. पण, अनियमित वीजपुरवठा, गंजलेली रोहित्र, वाकलेले विजेचे खांब, उघड्या वीजपेट्या, अतिभारित वीजवाहिन्या यामुळे आधीच नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असताना महावितरणच्या घेतलेल्या नव्या निर्णयामुळे या समस्यांमध्ये भर पडली आहे.

महावितरणकडून वीजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ ऑक्टोबरला परिपत्रक जारी करत सप्टेंबर महिन्यातील वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश महावितरणकडून वीजकेंद्रांना देण्यात आले होते. त्यानुसार परिणामी, ऑक्टोबरच्या महिन्याच्या वीज देवकट प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या वीजदरवाढीमुळे घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग या क्षेत्रांवर मोठा परिणाम होणार आहे. तसेच वसई विरार शहरातील सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांवर अतिरिक्त दरवाढीचा भार येणार आहे.

इंधन समायोजन शुल्कातील वाढीमुळे वीजदरात वाढ

वसई विरार शहरात वाढत्या स्थलांतरणामुळे मागील काही वर्षात विजेच्या मागणीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला खुल्या बाजारातून वाढीव दरात वीज खरेदी करावी लागत आहे. यामुळे वीज निर्मितीवर आकारण्यात येणाऱ्या इंधन समायोजन शुल्कातही वाढ झाली आहे. त्यामुळे शुल्कातील या वाढीमुळे ग्राहकांकडून आकारण्यात येणाऱ्या वीजदरात वाढ करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे.

असे असतील नवे दर (प्रति युनिट)

१-१०० युनिट – ३५ पैसे

१०१- ३०० युनिट – ६५ पैसे

३०१-५००युनिट – ८५ पैसे

५०० पेक्षा जास्त युनिट – ९५ पैसे

तीन ते चार महिन्यांपूर्वी अशीच दरवाढ लागू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता. पण, त्यावेळी नागरिकांनी दरवाढीविरोधात हरकती दाखल केल्या होत्या. वीज नियामक मंडळासमोर रीतसर याची सुनावणी झाली आणि दरवाढीचा निर्णय मागे घेण्यात आला. पण, महावितरणने पुन्हा या प्रकरणी फेरयाचिका दाखल केली आणि नागरिकांच्या हरकती न मागवता परस्पर वीज नियामक मंडळाच्या परवानगीने वीजदरवाढ लागू केली. पण, ऐन सणासुदीच्या काळात लागू करण्यात आलेली दरवाढ अत्यंत चुकीची आणि नागरिकांवरील आर्थिक भार वाढवणारी आहे. – जॉन परेरा, अध्यक्ष, वीज ग्राहक संघटना वसई