भाईंदर :- भाईंदर पश्चिमेच्या राई गावातील बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला. या कारवाईत १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ लाख ७५ हजारांची रोकड जप्त केली आहे.
भाईंदर पश्चिमेच्या राई गाव परिसरात एका बंद खोलीत छुप्या मार्गाने जुगार सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण व त्यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी तीन पत्ते जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. यात जुगार खेळणाऱ्या १८ जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
त्यांच्याकडून ४ लाख ७५ हजार रूपयांची रोकड व १८ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम-१८८७ चे कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.