विरार : गणराया पाठोपाठ रविवारी वसई विरार व भाईंदर अशा विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात गौराईचा आगमन सोहळा पार पडला. यंदाच्या वर्षी शहरात १ हजार ८४५ इतक्या घरगुती तर ३४ सार्वजनिक गौरींची प्रतिष्ठापना होणार आहे.वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात गौरी पूजन मोठ्या थाटात साजरे केले जाते. गौरीच्या मूर्तीसह शहरात पारंपरिक पद्धतीने तेरड्याची गौर ही पुजण्याची परंपरा आहे. गौरी आगमनाच्या दिवशी घरातील महिला उत्साहात मूर्तिशाळेत जाऊन गौरीची मूर्ती डोक्यावर घेऊन वाजत गाजत घरी येतात. गौरीला विशेष दागिन्यांनी, भरजरी वस्त्रांनी तसेच विविध सुवासिक फुलांनी, हार-वेण्यांनी सजविण्यात येते.
गौरीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर खास पंचपक्वान्नांचा नैवेद्य गौरीला दाखविण्यात येतो. तसेच यादिवशी गौरीसाठी म्हणून फराळही केला जातो. अनेक ठिकाणी गौरीसाठी गायली जाणारी पारंपरिक गीते गाऊन हा उत्सव आनंदात साजरा केला जातो. वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरामध्ये अनेक वर्षांपासून गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा असून काही ठिकाणी गौरी पूजनाचे शतक महोत्सव साजरे करण्यात आले आहे. रविवारी वसई भाईंदर अशा दोन्ही शहरात वाजतगाजत गौराई मातेचे आगमन मोठ्या उत्साह करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.
वसईत तेरड्याच्या गौरीची परंपरा
उत्तर कोकणाचा भाग असलेल्या आणि निसर्गाने समृद्ध असणाऱ्या वसईत अनेक ठिकाणी तेरड्याची गौरी पुजण्याची परंपरा आहे. यासाठी प्रामुख्याने पावसाळ्यात फुलणाऱ्या वनस्पतींचा वापर केला जातो. तेरडा, पेवा, इंदय (अग्निशिखा ) तसेच इतर वनस्पतींचा वापर केला जातो. प्रदेशानुसार या वनस्पतींमध्ये बदल होत असतो. याच गौरीला मुखवटा लावून तसेच साज शृंगार करून सजविले जाते. संपूर्ण घरात या गौरीला फिरविण्यात येते. याचे प्रतीक म्हणून जमिनीवर गौरीची पाऊले आणि दरवाज्यावर वगैरे हातांचे ठसे उमटविले जातात.