वसई / विरार : वसई विरार शहरात रात्री पासून सुरु असणाऱ्या पावसाचा जोर रविवारी वाढला आहे. यामुळे शहरातील सखल भाग पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे, विजेचे खांब कोसळले असून याचा परिणाम शहरातील वीज पुरावठ्यावर झाला आहे यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शहरात पावसाचा जोर वाढताना दिसत असून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळपर्यंत शहरात सरासरी १९९. ३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली यामुळे मध्यरात्रीपासूनच शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती.

रविवारी शहरातील विरार, नालासोपारा, तुळींज, गाला नगर वसई रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम परिसर, बंगली नाका, १०० फुटी रस्ता, समता नगर, पंचवटी नाका, एव्हरशाईन परिसर, चुळणे, नायगाव येथील स्टार सिटी, डॉन बास्को नायगाव रस्ता, टिवरी रस्ता आदी भागात पाणी साचले आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे. तर महामार्गावर वर्सोवा ते विरार फाट्या दरम्यान पाणी साचून वाहतूकीचा वेग मंदावला आहे.

दरम्यान शहरात नवरात्रोत्सव सुरु असून पावसाचा फटका शहरातील अनेक सार्वजनिक मंडळासह, प्रसिद्ध देवस्थांनाना भेटी देणाऱ्या भाविकांना बसताना दिसत आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी साचले असून खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील वाहतूक सेवा सुरळीत असून काही ठिकाणी साचलेल्या पाण्याचा परिणाम वाहतूक सेवेवर होताना दिसत आहे. काही ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब कोसळले आहेत तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.

भारतीय हवामान विभागाने रविवारी पालघर जिल्ह्यासह वसई विरार परिसराला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी शहरातील प्रशासनाने आपत्कालीन सेवा सज्ज ठेवल्या असून नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारी भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी तसेच मच्छिमारांनाही सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

वादळी वाऱ्यामुळे विजेचा खांब वाकला

वादळी वाऱ्यामुळे सोपारा गास रस्त्यावर असलेला महावितरणचा विद्युत खांब वाकला. तर विद्युत वाहक तारा ही खाली पडल्या त्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. गास गावातील गॉड्सन रॉड्रिक्स यांनी याची माहिती तातडीने महावितरणला दिली त्यानंतर युद्धपातळीवर वीज दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

आचोळे येथे घराचे छप्पर उडाले

जोरदार सुरू असलेल्या पावसाचा फटका शहराला बसू लागला आहे. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे डोंगरी भागात वादळी वाऱ्याने घरावरील छप्पर उडून खाली कोसळले आत यात एक जण जखमी झाला आहे. छप्पर उडून गेल्याने घरात पावसाचे पाणी पडून साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.