वसई:- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदार याद्यात होत असलेल्या गोंधळामुळे विविध प्रकारच्या चर्चांना ही उधाण आले आहे. यावर आता बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनीही भाष्य करत थेट भाजपाला टोला लागवला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वसई विरार शहरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे सभा, चौक सभा, बैठकांना ही जोर आला आहे. या सभेतून विविध पक्षांच्या राजकीय नेत्याकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैऱ्या ही झाडल्या जाऊ लागल्या आहेत.

बहुजन विकास आघाडीने ही शहरातील विविध ठिकाणच्या भागात कार्यकर्ता संवाद बैठका सुरू केल्या आहेत. राज्यात मतदान याद्यामधील गोंधळ, दुबार नावे यावरून सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात बहुजन विकास आघाडीही आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या बैठकीदरम्यान बविआ अध्यक्ष ठाकूर यांनी थेट भाजप नेत्याच खोचक टोला लगावला आहे.

मतदान याद्या बद्दल ठाकूर काय म्हणाले?

मतदार याद्यांच्या बाबतीत असेल, ईव्हीएम मशीनच्या बाबतीत असेल, दुबार नावाबद्दल असेल याबाबत सर्वच जण निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहेत. मात्र त्या प्रश्नांना उत्तरे भाजपाचे नेते देत आहेत असा टोला हितेंद्र ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. मला एक कळत नाही की प्रश्न आजपर्यंत एकाने पण भाजप नेत्याला विचारला नाही मग हे उत्तरे का देत आहेत असा सवाल त्यांनी केला आहे. अशात आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला आहे..

यापूर्वीही मतदार यादीवरून ठाकूरांनी साधला होता निशाणा

वसई-विरारमध्ये मतदार याद्यांमधील गोंधळावरून हितेंद्र ठाकूर यांनी यापूर्वीही सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. नालासोपारा विधानसभा निवडणुकीच्या यादीत सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे नाव एकाच पत्त्यावर ६ वेळा आढळले होते, विशेष म्हणजे त्या पत्त्यावर ती महिला राहतच नसल्याचे उघड झाले होते. वसई विरारमध्ये एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावे असल्याचा आरोप बविआने केला होता. मतदार यादीत पूजा सिंग या महिलेचे नाव ६३ वेळा, अभिषेक सिंग नावाच्या व्यक्तीचे नाव ४७ वेळा तर सुनील यादव याचे नाव ५३ वेळा आले असल्याचा आरोप बविआने केला होता. या प्रचंड गोंधळामुळे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केवळ मतदार नोंदणीवरच नव्हे, तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त केला होता.