वसई : नालासोपाऱ्यात बेकायदेशीर पणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परिणाम हा रिक्षांवर होत आहे. शनिवारी नालासोपाऱ्यात रिक्षा संघटनांनी एकत्र येत रिक्षा बंद आंदोलन केले. या रिक्षा बंद आंदोलनामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे मात्र हाल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई विरार शहराच्या वाढत्या नागरिकरणा पाठोपाठ रिक्षांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. त्यातच काही कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना बेकायदेशीर पणे रिक्षा चालवित आहेर. तर दुसरीकडे मॅजिकमधून प्रवासी वाहतुकीला बंदी असतानाही ते ही सर्रास पणे प्रवासी भरून वाहतूक करतात. याशिवाय पालिकेच्या बसेस ही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवितात.असे असतानाही वाहतूक विभाग त्यांच्याकडे कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकांच्या संघटनांनी शनिवारी नालासोपाऱ्यात रिक्षा बंद आंदोलन सुरू केले होते. यात संतोष भवन, धानिवबाग, बिलालपाडा, नालासोपारा फाटा येथील रिक्षा संघटना सहभागी झाल्या होत्या. सकाळी ९ वाजता तुळींज येथून नालासोपारा बस डेपो असा मोर्चा ही काढला होता. यावेळी त्यांनी मॅजिक व बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्याऐवजी परवाना धारक रिक्षा चालकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद होती. त्यामुळे नालासोपाऱ्यात कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांना ताटकळत राहावे लागले तर काही प्रवाशांना पायी प्रवास करीत जावे लागले असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal passenger vehicles in nalasopara led to rickshaw bandh protest on saturday sud 02