भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या आठ महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. २६ जानेवारी गेला आणि १५ ऑगस्टची तारीख उलटूनही या पुतळ्याचे अनावरण झालेले नाही. या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे महाराजांचा पुतळा झाकून ठेवण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेने मुंबई-अहमदाबाद मार्गांवरून किल्याजवळ जाणाऱ्या मुख्य चौकावर ३० फूट उंच ब्राँझ धातूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. मे. गारनेट इंटिरिअर या कंपनीने २०२१ मध्ये या पुतळ्याचे काम सूरु केले होते. पुतळा उभारण्यासाठी २ कोटी ९५ लाखाचा खर्च निर्धारित करण्यात आला आहे. त्यानुसार चौथरा उभा राहिल्यानंतर पुतळा उभारण्यात आला. मागील आठ महिन्यापासून हे काम पूर्ण होऊनही पुतळ्याचे अनावरण न झाल्यामुळे आता पुतळ्यावर लाल कपडा टाकून झाकण्यात आला आहे. पुतळा दुर्घटनेनंतर भाईंदरच्या या पुतळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
वाचा सविस्तर… वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
मुख्यमंत्र्यांच्या वेळे अभावी अनावरण लांबणीवर?
महापालिकेकडून या पुतळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सातत्याने लांबणीवर टाकला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधीचा आग्रह आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे उद्घाटनाची निश्चित तारीख ठरू शकलेली नाही. परिणामी नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
” छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचा दिवस अजूनही ठरवण्यात आलेला नाही.तसेच त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले काम सुरु आहे. ” – यतीन जाधव, उप-अभियंता ( मिरा भाईंदर महानगरपालिका )