भाईंदर– मंगळवार पासून मिरा रोड मधून बेपत्ता असलेल्या ७५ वर्षीय वृध्दाचा मृतहेद शुक्रवारी सकाळी नाल्यात आढळला आहे. एका केशकर्तनकाराने या वृध्दाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यासाठी त्यांची हत्या केली आणि मृतदेह नाल्यात टाकला होता. सीसीटीव्हीतून या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. काशिमिरा पोलिसांनी आरोपी केशकर्तनकाराला अटक केली आहे.

मयत विठठल तांबे (७५) हे मिरा रोडच्या शांती धाम येथील गौरव गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये मुलासह रहात होते. मंगळवार पासून ते बेपत्ता होते. बराच वेळ होऊनही ते परत न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी काशीमीरा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस आणि कुटुंबीय विठ्ठल यांचा शोध घेत होते.

सीसीटीव्हीच्या आधारे घेतला शोध

सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्यांचा शोध घेत असताना तांबे दुपारी दोनच्या सुमारास हे मिरा रोडच्या एमआयडीसी रस्त्यावरील सरस्सवती इमारतीत असलेल्या सागर नावाच्या एका केशकर्तनालयात (सलून) मध्ये गेल्याचे दिसले. मात्र तेथून परत निघताना दिसले नाहीत. पोलिसांनी केशकर्तनकाराकडे चौकशी केली. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे पोलिसांनी त्या दुकान परिसराचे सर्व सीसीटीव्ही तपासले. रात्री दोनच्या सुमारास एक इसम एका व्यक्तीस दुकानाच्या बाहेर ओढून जवळील नाल्यात त्याला टाकत असल्याचे दिसले

सोनसाखळीच्या लोभापायी हत्या

पोलिसांनी केशकर्तनकार अशफाक शेख (३८) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने विठ्ठल तांबे यांची हत्या केल्याची कबुली दिली. मंगळवारी तांबे हे केशकर्तनालयात आले. ते एकटेच होते. त्यांच्या गळ्यात सोनसाखळी होती. ती चोरण्यासाठी त्यांची गळा दाबून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह नाल्यातून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला अशी माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. अशफाक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, २३८, ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण (परिमंडळ १) यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला आणि आरोपीला अटक केली.