भाईंदर :- मीरा भाईंदर महापालिका शाळांमध्ये अद्याप कला शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना आवश्यक असा वाव मिळत नसल्याची खंत पालकवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या एकूण ३६ शाळांमध्ये सुमारे ९ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांतील मुले शिक्षण घेतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी महापालिकेवर आहे. या उद्देशाने महापालिकेने गेल्या काही वर्षांत विविध योजना राबवल्या असून, त्यामुळे शाळांतील विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे.
मात्र, दुसरीकडे या शाळांमध्ये कला शिक्षकच नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चित्रकला, हस्तकला, नृत्य, संगीत यांसारख्या कलात्मक विषयांचे प्रशिक्षण मिळत नाही. शिक्षण विभागाने महापालिकांना शाळांमध्ये कला शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले असून, त्यासाठी विशेष अनुदानाचीही तरतूद करण्यात आलेली आहे. तथापि, शिक्षकांची नियुक्तीच न झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले उत्कृष्ट कला गुण दडपले जात असल्याचा आरोप आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केला आहे.
कलेचे शिक्षण सुरूच असल्याचा पालिकेचा दावा
महापालिकेतील सुमारे २०० शिक्षकांपैकी अद्याप एकाही कला शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत नसल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. अनेक शिक्षक स्वतःच कला गुणांनी संपन्न असल्याने तेच विद्यार्थ्यांना विविध कलांचा परिचय करून देतात, अशी माहिती उपायुक्त सचिन बांगर यांनी एका जाहीर बैठकीत दिली.
क्रीडा शिक्षकांची नियुक्ती
यापूर्वी महापालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षकही नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळांबाबत जागरूकता कमी होती. मात्र क्रीडा प्रेमींच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षीपासून क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.