वसई: इंडिया आघाडी सत्तेच्या लालसेपोटी देश तोडण्याचे काम करत असून मुंबईत दहशत माजवणाऱ्या अतिरेक्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केला. पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी धामी सोमवारी नालासोपाऱ्यात आले होते.

नालासोपाऱ्यातील आचोळे येथे उत्तराखंडच्या नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी धामी यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टिका केली. काँग्रेस दहशतवाद्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारच्या काळात भारत विकसित होत असल्याचे धामी यांनी आपल्या भाषणात सांगितले. भाजपचे सरकार आल्यापासून उत्तराखंडमध्ये अनेक विकासकामे झाली आहेत. ऋषिकेश ते कर्णप्रयाग ट्रेनचे काम जोरात सुरू आहे, सध्या उत्तराखंडच्या चार धामच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा : वसई : गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिपॅडची जागा बदलली, मुस्लिम संघटनांच्या तीव्र विरोधानंतर निर्णय

मुंबईतील चित्रपट निर्मात्यांना आम्ही उत्तराखंडमध्ये चित्रिकरणाचा आग्रह केला आणि आज उत्तराखंडमध्ये दोनशे चित्रपटांचे चित्रिकरण सुरू आहे. त्यामुळे उत्तराखंडमधील लोकांना रोजगार मिळत आहे, असे ते म्हणाले. मुंबईत राहूनही समाजातील लोकांनी आपली संस्कृती आणि वारसा जिवंत ठेवला आहे. पहाडी नथुली आणि गुलबंध परिधान करून आलेल्या महिलांचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी धामी यांनी काँग्रेसवर जोरदार टिका केली. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, त्यामुळे महायुतीचे उमेदवार डॉ.हेमंत सवरा यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.