वसई:- वसई विरार शहरात अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून बेफिकीरपणे वाहने चालवितात. काहीवेळा अपघाताच्या घटनाही समोर येत आहेत. अशा वाहनचालकांना आवर घालण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन विभागात अत्याधुनिक दोन इंटरसेप्टर वाहने दाखल झाली असून त्याद्वारे आता कारवाई केली जाणार आहे.

वसई विरार शहरातील रस्त्यावर काही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवित असतात. याचा फटका वाहतुकीला बसत असतो. यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना घडत असतात. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मद्यपान करून वाहने चालविणे, विना सीटबेल्ट, विना परवाना, विना हेल्मेट प्रवास, तसेच भरधाव वेगाने वाहने चालविणे, अधिक क्षमतेने दुचाकी चालविणे, वाहने चालविताना मोबाईलचा वापर, गाड्यांवर वाहन क्रमांक पाट्या नसणे अशा विविध प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात.

शहरात काही वाहनचालक हे बेदरकारपणे वाहने चालवित असतात त्यामुळे अपघात घडून मृत्यूच्या घटना समोर येतात. काही दुचाकीचालक हेल्मेट चा वापर करीत नसल्याने अपघातात डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांना आता पायबंद घालण्यासाठी परिवहन विभागाकडून आधुनिक स्वरूपात कारवाईला सुरुवात केली जाणार आहेत.

वसईच्या प्रादेशिक परिवहन विभागात दोन इंटरसेप्टर वाहने दाखल झाली आहेत.यात लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन, ई-चलन यंत्रणा, मद्यपींवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनलायजर अशी अत्याधुनिक यंत्रणा समाविष्ट आहे. अशा प्रकारच्या यंत्रणांमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसेल असा विश्वास प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

इंटरसेप्टर वाहनातील सुविधा

वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर स्पीडगनने कारवाई करण्यात येते. ‘इंटरसेप्टर वाहनात’मध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन आहे. पूर्वी रस्त्याच्या कडेला थांबून, स्पीडगनद्वारे कारवाई केली जात होती. आता नव्या वाहनात स्पीडगन ठेवण्याची सुविधा (ट्रायपॉड) आहे. इंटरसेप्टर वाहनांने होणाऱ्या कारवाईमुळे पोलिसांकडे पुरावे उपलब्ध होणार आहेत. स्पीडगन, ई-चलन यंत्रासह अन्य सुविधांचा समावेश या वाहनात आहे.मोबाईलवर बोलत असतानाही एखादा चालक जात असेल त्याची माहिती ही मिळणार आहे. यामुळे महामार्गावर गस्त घालणे, गुन्हेगारांचा पाठलाग करणे तसेच नियमांचे उल्लंघन करून पळणाऱ्या वाहनांचा पाठलाग करणे सुलभ होणार आहे.