वसई: विरारमध्ये राहणार्‍या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक चित्रफित तयार केली होती. पत्नीकडून होणारा त्रास आणि पोलिसाने दिलेल्या धमकीमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यात म्हटले होते. यामुळे संतप्त नातेवाईकांनी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी मयत तरुणाच्या पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तर आरोप असलेल्या पोलिसाची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार पुर्वेच्या मनवेलपाडा येथे अभय पालशेतकर (२८) हा पत्नी आरोही पालशेतकर (२५) हिच्यासोबत रहात होता. ११ महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्यात कौटुंबिक वाद होते. शनिवारी पत्नीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांना अभयला बोलावून १४९ अंतर्गत नोटीस देऊन समज दिली होती. नंतर घरी आल्यावर अभयने घरातील हॉलच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चित्रिफत तयार केली होती. पत्नीने खोटी तक्रार दिली तर सुनिल पवार नामक पोलिसाने टायर मध्ये घालून मारण्याची धमकी दिल्याने मी आत्महत्या करत असल्याचे या चित्रफितीत त्याने सांगितले. ही चित्रफित सर्व नातेवाईकांना पाठवली होती. यामुळे शनिवारी रात्री अभयच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात कारवाईच्या मागणीसाठी गोंधळ घातला होता.

हेही वाचा : ‘हिट ॲण्ड रन’च्या आरोपीला पंजाब मधून अटक, ६० सीसीटीव्ही तपासून पेल्हार पोलिसांची कारवाई

मला न्याय द्या- मयत अभयची आई

माझ्या मुलाला पोलिसांनी मारलं, धमकी दिली. बळजबरीने सही करायला लावली. टायरमध्ये टाकून कोंबडाकरून मारेन, कसा जामीन मिळतो ते बघतो, अशी धमकी दिली त्यामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केली असा आरोप मयत अभय पालशेतकर याची आई उज्वला पालशेतकर यांनी केला आहे. ज्या पोलिसाकडे तक्रार होती तो काही बोलत नव्हता. मात्र शेजारी असलेला सुनिल पवार याने माझ्या भावाला धमकी दिल्यामुळे तो घाबरला आणि त्याने आत्महत्या केली, असे मयत अभयचा भाऊ निर्भय याने सांगितले.

हेही वाचा : पालघर लोकसभेसाठी बविआने कंबर कसली, प्रत्येक कार्यकर्त्याने उमेदवार समजून कामाला लागण्याचे आदेश

पत्नीवर गुन्हा, पोलिसाची विभागीय चौकशी

या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत अभयच्या पत्नीवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मयताचे पत्नी सोबत कौटु्ंबिक वाद होते त्यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) जयंत बजबळे यांनी सांगितले. पोलिसाने धमकी दिल्याचा आरोप आहे. त्याची विभागीय चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असेही बजबळे यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai young man commits suicide after police threatened him recorded video before suicide css
Show comments