विरार :  अवघ्या काही दिवसांवर ‘मकर संक्रात’ आल्याने त्यानिमित्त लागणाऱ्या वस्तू, साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.  मकर संक्रांती आणि पतंग असे समीकरण  असल्याने बाजारात वेगवेगळय़ा आकार, रंगांचे पतंग  आणि मांजे दिसू लागले आहेत.  मागील वर्षीच्या तूलनेत पतंग आणि मांज्याच्या किमतीत १० ते २०  टक्क्यांची वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई, विरारमध्ये पतंग आणि मांजा घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे. चायनामेड पतंगसुद्धा पाहायला मिळत आहेत.   ग्राहकांची मागणी असल्याने बाजारात घोटी कागदाच्या विविधरंगी, शेपटीच्या, बिनशेपटीच्या वेगवेगळय़ा आकाराच्या पतंगांबरोबर चायनामेड पीकॉक, रेनबो, टायगर, ड्रॅगन, ईगल, त्याचबरोबर विविध प्राणी आणि पक्ष्यांच्या आकाराच्या बहुरंगी पतंग बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमत ५० ते  ५०० रुपयापर्यंत आहे.

कागदाच्या पारंपरिक पतंगसुद्धा यावेळी विविध रंगसंगतीने आणि वेगवेगळय़ा आकाराने बाजारात दाखल झाल्या  आहेत. त्याची किंमत ८ रुपयांपासून २५० रुपयापर्यंत आहे. याच किमती मागील वर्षी ५ रुपयांपासून १५० रुपयापर्यंत होत्या  सध्या बाजारात असलेल्या विविध आकाराच्या आणि रंगाच्या पतंगावर विविध सेलिब्रेटी आणि राजकारणी यांचे फोटो आहेत.

आणखी वाचा – मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? यामागचे ‘हे’ कारण जाणून तुम्हीही पतंग उडवाल

तर, खेळाडू आणि विशेषत बच्चे कंपनींना आकर्षित करण्यासाठी पोकेमॉन, छोटा भीम, मोटू पतलू तसेच स्पायडरमॅन, सुपर मेन, अव्हेंजर यांची चित्र असलेल्या तसेच इतर विविध कार्टून कलाकारही पतंगावर दिसत आहेत. 

चायनीज मांजाची खुलेआम विक्री : बंदी असतानाही चायनीज आणि नायलॉन मांजाची वसई विरारमध्ये धडाक्यात विक्री सुरू आहे. पशु-पक्षीसह मनुष्याच्या जिवाला धोकादायक ठरणाऱ्या चिनी आणि नायलॉनच्या मांजावर राज्य सारकारने बंदी आणली आहे. पण ही बंदी झुगारून वसई विरारमध्ये खुलेआम या मांजाची विक्री आणि साठवणूक सुरू आहे. या मांजामुळे दरवर्षी अनेक पक्षी आणि नागरिक जखमी होत असतात. तरीसुद्धा हा मांजा वसई आणि आसपासच्या परिसरात खुलेआम विकला जात आहे. त्याची किंमत ६० ते ७० रुपये तोळा तर फिरकी ३०० रुपयांपासून ८०० रुपयापर्यंत  उपलब्ध आहेत.

आणखी वाचा – मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे सेवन का करतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण

पशुपक्ष्यांच्या उपचारांची व्यवस्था 

संक्रांतीच्या निमित्ताने वसई विरार शहरात अनेक जण पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. यामुळे आकाशात मुक्तपणे विहार करणारे कबुतर, पोपट यासह इतर पक्षी पतंगाचा मांजा लागून व त्यात अडकून जखमी होण्याच्या घटना समोर येतात. या जखमी झालेल्या पक्ष्यांना तात्काळ उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत यासाठी करुणा ट्रस्ट, विरार यांच्यामार्फत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १४ व १५ जानेवारी हे दोन दिवस ही सेवा शीतलनगर, आगाशी रोड, विरार पश्चिम या ठिकाणी ठेवली जाणार असल्याची माहिती प्राणिमित्र मितेश जैन यांनी दिली आहे. यासाठी ९२७३९१०००४ व ८९५६३०९९०९ या  हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जैन यांनी केले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Markets decorated for makar sankranti zws