वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही वाहिन्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रविवारी सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून दररोज मुंबई , ठाणे, पालघर, वसई विरार, मिराभाईंदर, गुजरात यासह इतर भागात ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते.दोन दिवसांपासून ठाणे घोडबंदर भागात रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे अवजड वाहनांना ठाण्यातील मार्गावर प्रवेश बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा…वसई : इमारतीच्या आवारात विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

तर दुसरीकडे महामार्गावर रस्त्याच्या काँक्रिटीकरण करण्याचे काम देखील सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मागील दोन दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. वाहतूक कोंडीत तासंतास वाहने अडकून पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

हेही वाचा…खिशातील एक चिठ्ठी आणि गुगलवरून शोध, महामार्गावरील तरुणाच्या हत्येची उकल

रविवारी सकाळी ६ वाजल्या पासूनच महामार्गावर वर्सोवा पुलापासून ते विरार पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले आहे. जवळ पास १५ ते २० किलोमीटर पर्यंत या रांगा गेल्या आहेत. वाहतूक कोंडी नियंत्रणाचे काम वाहतूक पोलीस करीत आहेत. मात्र प्रचंड वाहनांची संख्या अरुंद झालेला रस्ता यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.