Mira Bhayandar Potholes भाईंदर: मिरा भाईंदर शहर महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासने आणि तात्पुरत्या खड्डे दुरुस्तीनंतरही येथील रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ आहे. ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे, उंच-सखल रस्ते आणि रस्त्यावर पसरलेली खडी यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याच दयनीय अवस्थेमुळे आता मिरा-भाईंदरमधील रस्त्यांचा मुद्दा केवळ तक्रारींपुरता मर्यादित न राहता समाज माध्यमांवर उपहासात्मक टीकेचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. याच दरम्यान, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी चक्क कर्ज मागण्याची वेळ स्थानिकांवर आल्याचे एका व्हिडिओतून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

निकृष्ट दर्जाची रस्तेदुरुस्ती आणि गेल्या काही काळात पडलेला मुसळधार पाऊस यामुळे मिरा भाईंदर शहरातील मुख्य तसेच अनेक जोड रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यात मिरारोड रेल्वे स्थानक परिसरातील रस्ता, भाईंदरमधील पूर्व-पश्चिम जोडणारा रस्ता, काश्मीरा- गोल्डन नेस्ट मार्ग, ठाणे आणि मीरा-भाईंदर मधील घोडबंदर मार्ग अशा अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचा देखील समावेश आहे.

रस्त्यांवरील दिवसेंदिवस वाढणाऱ्या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना या रस्त्यांवरून वाहन चालवताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तर अनेकदा जीवघेण्या अपघातांना देखील सामोरे जावे लागते. त्यामुळे रस्ते दुरुस्त करण्यात यावे अशी तक्रार नागरिकांकडून पालिका प्रशासनाकडे केली जाते. मात्र अनेकदा तक्रारी करूनही रस्ते दुरुस्त केले जात नसल्यामुळे शहरातील खड्डे हा समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे.

मिरा-भाईंदर शहराशी संबंधित इंस्टाग्राम पेजेसवरून दररोज उपहासात्मक रील, मिम्सच्या माध्यमातून सातत्याने रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत टीका केली जाते. अशातच आता समाजमाध्यमांवर व्हायरल होणारा एका दुचाकी स्वाराचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओत दुचाकीस्वार “कर्ज पाहिजे, रस्त्यावरील खड्डे बुजवायला” असं लिहिलेलं जॅकेट घालून मिरा भाईंदर शहरातील रस्त्यांवर स्कूटर घेऊन फिरताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट कमेंट करत त्याच्या या अनोख्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.