वसई: मंगळवारी मिरा भाईंदर शहरात मनसे कार्यकर्ते व मराठी भाषिक नागरिकांनी मोर्चा काढला. या मोर्च्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी विविध तुकड्या तैनात करत कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. विशेष या आंदोलनावर ड्रोन द्वारे नजर ठेवली जात आहे.
मिरा भाईंदर शहरात निघणाऱ्या मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. असे जरी असले तरीही मोर्चा काढण्यावर मोर्चेकरी ठाम राहत शहरात मोर्चा काढला. शहरात मिरा भाईंदर शहरासह अन्य भागातील ही मराठी भाषिक नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मात्र आंदोलन सुरू होताच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली त्यामुळे हे आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे.
आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी, राखीव दल, सुरक्षा दलाचे जवान आणि दंगल नियंत्रण पथक रस्त्यावर तैनात करण्यात येणार आहेत.याशिवाय, आंदोलनावर करडी नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, समाजमाध्यमांवर सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवरदेखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.