विरार : मीरा भाईंदर वसई विरार शहरात अमली पदार्थ विरोधी कारवाई मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाकडून तीव्र करण्यात आली असून यामुळे कारवाईची विविध प्रकरणे समोर येत आहेत. नुकताच पोलिसांकडून एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध २७ गुन्ह्यांमधील जप्त करण्यात आलेले २९ कोटी किमतीचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
मीरा भाईंदर वसई विरार शहरात गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थ तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत असून शहरात विविध राज्यातून अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले होते. याबाबत आता आयुक्तालयाकडून तीव्र कारवाई सुरु करण्यात आली असून मागील काही दिवसात अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणातील आरोपींवर कारवाई करत पोलिसांकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
नुकताच पोलिसांकडून एनडीपीएस कायद्यांतर्गत विविध २७ गुन्ह्यांमधील जप्त करण्यात २४० केली ४२० ग्रॅम वजनाचे २९ कोटी ७६ लाख ४६ हजार ४५० रुपये इतक्या किमतीचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. यात गांजा, चरस, मेफेड्रोन, हेरॉईन, कोकेन, कफ सिरप बाटल्या अशा प्रकारच्या अमली पदार्थांचा समावेश आहे.
पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ नुकताच तळोजा येथील वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड येथे नष्ट करण्यात आले आहेत. अशी माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाकडून देण्यात आली आहे.