वसई: ठाणे-घोडबंदर मार्गावर ११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुक सेवा विस्कळीत होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रविवारी सकाळपासूनच वर्सोवा पूल ते चिंचोटी या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे.  त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने या महामार्गावर वाहनांची वर्दळ असते.

सद्यस्थितीत घोडबंदर मार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने पुन्हा एकदा ११ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आले आहे. यासाठी यामार्गावर होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करून ती चिंचोटी भिवंडी या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे वाहनांच्या रांगा या थेट राष्ट्रीय महामार्गापर्यंत येऊन पोहचल्या आहेत. रविवारी सकाळ पासून वर्सोवा पूल ते चिंचोटी फाटा या दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका ठाणे, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.

दिवाळीचा सण तोंडावर असल्याने अनेक जण आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी बाहेर पडले होते. जवळपास दोन ते तीन तास कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. त्यातच आता ऑक्टोबर हिट ही सुरू झाली आहे. एकीकडे वाहतूक कोंडी तर दुसरीकडे कडक्याच्या उन्हाने अंगाची लाही लाही होत असल्याचे एका प्रवाशाने सांगितले आहे. ऐन सणासुदीला अशा प्रकारे कोंडी झाल्याने निश्चित स्थळी जाता आले नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. चिंचोटी महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.