वसई:- नालासोपारा पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळच्या रस्त्यावर रिक्षाचालक प्रवासी वाहतुकीसाठी विरुद्ध बाजूने रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे हा रस्ता अरुंद होऊन याचा मोठा परिणाम हा वाहतुकीवर होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
नालासोपारा पूर्वेच्या भागातून महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता गेला आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ अधिकच वाढली असून या भागात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी अजूनही पालिकेकडून हव्या त्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात नाहीत. याचा मोठा परिणाम वाहतुकीवर होऊ लागला आहे. त्यातच आता नालासोपारा उड्डाणपुलाच्या बाजूने महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर विरुद्ध दिशेने रिक्षा उभ्या करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही वेळा या रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागतात. या रिक्षा मध्येच उभ्या केल्या जात असल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ लागले आहे.
रिक्षा चालकांच्या या मनमानी कारभारामुळे याचा सर्वसामान्य वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. याकडे वाहतूक विभाग ही लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस सरार्स पणे प्रवासी वाहतुकीसाठी विरुद्ध दिशेने वाहने उभी करण्याचे प्रकार सुरू आहेत.
नालासोपारा स्थानकाजवळच्या रस्ता आधीच वाहतुक कोंडीने वेढलेला असतानाच आता त्याच रस्त्यावर रिक्षा चालकांच्या या प्रकारामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. त्या विरुद्ध दिशेने वाहने उभी करतील किंवा जे विरुद्ध दिशेने वाहने काढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे वाहतूक विभागाने सांगितले आहे.
फेरीवाल्यांचाही त्रास
नालासोपारा पूर्वेच्या उड्डाणपुलांच्या दोन्ही बाजूचे फुटपाथ व मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या फेरीवाल्यांच्या समस्येमुळे येथून ये जा करताना ही नागरिकांना अडचणी येत आहेत. एकीकडे फेरीवाले तर दुसरीकडे बेशिस्त रिक्षाचालक यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कोंडी होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
