वसई : मागील दोन आठवड्यापासून प्रतीक्षेत असलेली वसई भाईंदर रोरो सेवा अखेर मंगळवार पासून सुरू करण्यात आली आहे. सकाळी ९ च्या सुमारास विविध राजकीय पक्षाचे नेते व महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. सध्या “प्रायोगिक तत्त्वावर” रो-रो प्रवासी सेवा सुरु दिली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्दीसेस प्रा. लि. यांच्या मार्फत ही चालविली जात असून या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवासी अशी आहे. या बोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळालेली असून जेटीची सर्व कामे महाराष्ट्र सागरी मंडळाने केली आहेत.

हेही वाचा… Maharashtra Assembly Special Session Live: “२२ राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण”, मुख्यमंत्र्यांनी केली मराठा आरक्षणाची घोषणा; म्हणाले…

दोन वेळा या रोरो सेवेचे उदघाटन रद्द झाले होते. त्यामुळे उत्साहात असलेल्या प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले होते. मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्र सागरी मंडळाने ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा निर्णय घेत अखेर मंगळवार पासून या सेवेला वसई खाडी येथून सुरवात करण्यात आली आहे. सकाळी ९ वाजता ही फेरीबोट वसई येथून भाईंदर साठी रवाना करण्यात आली. या पहिल्याच दिवशी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना वगळता मोजक्याच प्रवाशांनी प्रवास केला.तर पहिलाच प्रवास मोफत झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण पसरले होते.

प्रवाशांच्या प्रतिक्रिया

“यापूर्वी भाईंदरच्या उत्तन गावात जाण्यासाठी रेल्वेने लांबचा प्रवास करावा लागत होता. पण आता भाईंदर वसई प्रवास अगदी पंधरा मिनिटांने व सोप्या पद्धतीने होत असल्याने आनंद वाटत आहे.” – आत्माराम देघडे, प्रवासी

” रो -रो सेवे बाबत आम्ही सातत्याने बातम्या वाचत होतो. त्यामुळे याने प्रवास करण्याची उत्सुकता निर्माण झाली होती.म्हणून आज सकाळीच लवकर येऊन पहिल्या प्रवासाचा लाभ घेतला. ” – राजेंद्र व स्मिता वाघ, दांपत्य प्रवासी.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On pilot basis ro ro boat service between vasai and bhayander finally started relief for passengers asj
First published on: 20-02-2024 at 14:01 IST