लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मिरा रोड दंगलीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे आमदार ठाकूर राजा सिंह उर्फ टी राजा यांनी मिरा रोड येथे शिवजयंतीचे निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी चौकसभेत त्यांनी वादग्रस्त मुद्दयांचा उल्लेख करत प्रक्षोभक भाषण केले. ‘मला रोखण्यासाठी अनेक शक्तीनीं प्रयत्न केले, मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले असून मी हिंदू राष्ट्र तयार करण्याचा संकल्प घेऊनच काम करणार असल्याचे ते म्हणाले.

जानेवारी महिन्यात मिरा रोड येथे राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आयोजित मिरवणुकीवर दगडफेड झाल्यानंतर दोन समुदायात दंगे उसळले होते. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटले होते. या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे आमदार टी राजा यांनी मिरा रोड मध्ये येऊन शिवजयंती साजरी करणार असल्याची घोषणा केली होती.मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहणार असल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर टी राजा समर्थकांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना सशर्त परवानगी दिली होती.

आणखी वाचा-महापालिकेच्या वाहनाखाली येऊन दुचाकीस्वार ठार, भाईंदर पश्चिम येथील घटना

त्यानुसार रविवारी दुपारी आमदार गीता जैन यांसह टी राजा यांनी काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून भव्य अशी मिरवणूक काढली. यात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी कऱण्यात आली.

या प्रसंगी त्यांनी लव जिहाद, गोहत्या, अशा विषयांवर भाष्य केले. याशिवाय समान नागरी कायद्याची अंमलबजावणी तसेच किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याचे आवाहन त्यांनी शासनकडे केले. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी अनेकदा आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग केला होता. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.