भाईंदर पश्चिम येथील साठफुटी रस्त्यावर कचरा वाहून नेणाऱ्या महापालिकेच्या वाहनाखाली येऊन एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून कौशिक हावली (४६) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी दुचाकीवरून बाजार घेण्यासाठी निघालेल्या कौशिक यांच्या दुचाकीचा चाक अचानक नवरंग हॉटेल समोर घसरला. त्यामुळे त्यांची गाडी थेट रस्त्यावर घसरत पुढे जाऊ लागली. इतक्यात समोरून येणाऱ्या महापालिकेच्या गाडी चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी मागील चाकाखाली येऊन कौशिक चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा : वसई : चारचाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अर्नाळा राजोडी रस्त्यावरील घटना
त्यानंतर भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत शरीर ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी जोशी रुग्णालयात पाठवले आहे. याशिवाय महापालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाडीला व चालकाला ताब्यात घेतले असून कायदेशीर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांनी दिली आहे. या रस्त्यावरील सिमेंट रस्त्याचे काम सुरळीत न झाल्यामुळे रस्त्यावरच दगडाचे बारीक दगड तयार होत आहे. आणि दगडावरून सातत्याने वाहन घसरत असल्याची तक्रार स्थानिक माजी नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांनी दिली आहे.