Thane Ghodbunder Road Close: भाईंदर : ठाणे -घोडबंदर मार्गांवर सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामामुळे एक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ठाण्याहून घोडबंदरकडे येणाऱ्या मार्गांवर २० मिनिटांच्या अंतराने वाहतूक सोडली जात आहे. परिणामी या मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या स्थितीचा फटका संपूर्ण मुंबई उपनगरातील वाहतुकीवर बसला आहे.

ठाणे-घोडबंदर मार्गाच्या डांबरीकरणाचे काम मिरा-भाईंदर महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ११ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान जड व अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना मिरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून हे काम सुरू असून, त्यामुळे वाहतुक कोंडीची भीषण समस्या उभी राहिली आहे.

प्रामुख्याने या कामासाठी घोडबंदरहून ठाण्याकडे जाणारा मार्ग गायमुखपर्यंत बंद करण्यात आला आहे.त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरकडे येणाऱ्या मार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. या मार्गावर पोलीस कर्मचारी २०–२० मिनिटांच्या अंतराने वाहतूक सोडत आहेत. मात्र त्यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि ठाणे मार्ग पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती मिळाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवाशांचे दोन ते तीन तास एकाच ठिकाणी अडकून वाया जात आहेत. याचा परिणाम मुंबईहून ठाण्याकडे तसेच वसईहून भिवंडीकडे जाणाऱ्या मार्गांवरही दिसून येत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस या मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अवजड वाहनांचा फटका

ठाणे–घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना तीन दिवसांसाठी बंदी घालण्यात आली असली तरी, पालघर जिल्ह्यातून विरार पथकर नाक्यापुढे अनेक अवजड वाहने अद्याप या मार्गावर येत आहेत. त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने दरवेळी किमान पाच-पाच अवजड वाहने या मार्गावरून सोडावी लागत आहेत. या वाहनांमुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला जात असून, वाहतूक कोंडीची समस्या अधिकच तीव्र झाली आहे. याबाबत काशीमीरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी माहिती दिली आहे.